कोणते खरे नागपंचमी व्रत व महापूजा ?

642

हिंदू सण : नागपंचमी विशेष

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील भूतदया सांगणारा सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली, असे मानले जाते. नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष व्रतस्थ असतात. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी अर्थात अहिल्या-गौतमी संगमावर स्नान करतात.
अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते. मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत- भविष्योत्तरपुराण: ३२/२/७-
“वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः|
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ||”
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प होय. त्याच्या फण्यावर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते. त्याचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. त्याची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन पूजा विषय बनवले. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो. नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सासूला म्हणते-
“पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला।
बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायाला।।”
या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो, अशी पद्धती भारतात रूढ आहे. तरुणी पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावतात, ही पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. स्त्रिया झाडाला पाळणे बांधून झोके घेतात. मौजैने झोके घेत नागपंचमीची गाणी म्हणतात-
“फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले.”
पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणत असत. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळत. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळत. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळे करताना दिसत-
“नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी.
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी.
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा!
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा!!
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा!
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा!!”
भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध-लाह्या या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही, त्याला त्यातून अपाय होऊ शकतो; हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्यापूर्वी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात-
“नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या,
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया।
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा,
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा।”
आधुनिक काळात नागपंचमीचे व्रत कसे करावे? तर आजचे नागपंचमीचे व्रत नागप्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून माहित करता येईल. दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे. नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची महत्वाकांक्षा पूर्ण करायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणांबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना खुप आनंद होतो. मग त्या भविष्याची सुखस्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे, अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. नाग पंथाचा इतिहास आणि त्यासंबंधी विविध कलांची माहिती घेणे.
फार पूर्वी एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला. अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व काहीही कुटायचे नाही. असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. आपले संरक्षण कर, अशी प्रार्थना करतात. यावर त्रिकालदर्शी संतशिरोमणी कबीर महाराजांनी लिहिले-
“सोने का जब नाग बना के,
पुजते यह दिन भाई!
असली नाग निकल पडा,
तो दे डंडा लवलाई!
अनाडी दुनिया, प्रभु जी कैसे तरिओ!!”
खरे तर माणसानेही त्याचे नेहमी रक्षण केले पाहिजे. साप दिसताच त्याला लाठीकाठीने बदडून ठार केले जाते, या आपल्या निर्दयीवृत्तीला आवर घातला पाहिजे. त्याची भिती वाटणे साहजिकच आहे, मात्र त्याला मारून दूर फेकणे योग्य नाही. तर सर्पमित्रांकरवी त्याला निर्जनस्थळी नेऊन सोडणे, हेच खरे नागपंचमी व्रत व महापूजा ठरेल!
!! The गडविश्व परिवारातर्फे नागपंचमीच्या सर्व सानथोर बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
एकता चौक- रामनगर, गडचिरोली.
मधुभाष- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here