– ढिवर समाजाच्या बैठकीतील सूर
The गडविश्व
गडचिरोली,१६ जुलै : विदर्भात मोठ्या संख्येने असलेला ढिवर समाज दैन्यावस्थेमध्ये असून मुख्य प्रवाहात येण्यासाठी पारंपारिक जल, जंगल, जमीनीचे हक्क आणि अधिकार कायदेशीररित्या मिळवण्यासाठी संघर्ष करणे हाच पर्याय असल्याचा सूर ढिवर समाजाच्या बैठकीत निघाला.
गडचिरोली येथील पत्रकार भवनात ढिवर समाजाच्या कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक आज १६ जुलै रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सितकुराजी जराते, मार्गदर्शक म्हणून भाई रामदास जराते तर जयश्री वेळदा, तुकाराम गेडाम, डंबाजी भोयर, दादाजी कांबळे, किशोर गेडाम, रेवनाथ मेश्राम, दुधराम सहारे, पत्रूजी साखरे, सत्यवान भोयर, किसन टिंगुसले प्रामुख्याने उपस्थित होते.ढिवर समाज नदी, नाले, तलावांमध्ये सिंगाळा उत्पादन करणे, मासेमारी करणे, जंगलात कोसारानाचे ( रेशीम) उत्पन्न घेण्याचे काम करत आलेला असतांनाही सध्या या समाजाला पारंपारिक जल, जंगल, जमीनीचे हक्क आणि अधिकार मिळाले नसल्याने संपत्तीपासून अलिप्त राहून संपूर्ण समाज व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. यातून बाहेर निघून मुख्य प्रवाहात येण्यासाठी कायदेशीर संघर्ष करण्याची गरज असून वनाधिकार, पेसा यासारख्या कायद्याच्या माध्यमातून आपले हक्क मिळवण्यासाठी राजकीय भुलथापांना बळी न पडता समाजाने सामुहिक लढा उभारावा असेही यादरम्यान ठरविण्यात आले.
ढिवर समाजाच्या लोकांना त्यांच्या पारंपारिक कोसा रानाची जमीन वनहक्क कायद्यातील तरतुदीनुसार वाटप होण्यासाठी दावा अर्ज भरुन घेणे, मासेमारी करीता तलावांची मालकी वनहक्क कायद्यातील तरतुदीनुसार ढिवर समाजाला सामुहिक हक्कांअंतर्गत मिळण्यासाठी दावा अर्ज दाखल करणे, ढिवर समाजाच्या पारंपारिक मासेमारी हक्कांअंतर्गत पेसा क्षेत्रातील तलावांमधील मासेमारीचे मालकी हक्क पुन्हा समाजाकडे मिळविणे, स्व.वसंतराव नाईक भटक्या विमुक्त महामंडळाकडून ढिवर समाजाच्या तरुणांना व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध व्हावे, गडचिरोली जिल्ह्यात ढिवर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देवून शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरीत संधी मिळावी यासाठी निरंतर लढा लढण्याचा निर्धारही करण्यात आला.
बैठकीला चंद्रकांत भोयर, खुशाल मेश्राम, आनंदराव भोयर, नरेंद्र मेश्राम, ईश्वर गेडाम, मुर्लिधर टिंगुसले, नागोजी भोयर, जीवन गेडाम, कालिदास जराते, नथुजी शेंडे, श्रीधर भोयर, दिगांबर ठाकरे, संजय मेश्राम, किशोर पोवनकर यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांमधील कार्यकर्ते उपस्थित होते.