– सिरोंचात पून्हा चौथ्या दिवशी गर्दी वाढली
– प्रशासनाकडून सोयीसुविधा वाढविण्यावर भर
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर पवित्र स्नानासाठी बारा वर्षानंतर भरलेल्या पुष्कर मेळाव्यात ओम नमः शिवायच्या जयघोषात सर्व भाविक तल्लीन झाल्याचे चित्र चौथ्या दिवशीही आढळले. यावेळी नदी काठावर श्रध्दाळूंच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यावर काल पासून प्रशासनाकडून भाविकांसाठी अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्वात जास्त सावलीची आवश्यकता असल्याने सिरोंचा घाट, नगरम घाट व दोन्ही ठिकाणच्या सर्व वाहनतळांवर शेड उभारले आहेत. पिण्याच्या पाण्याची जास्तीची सोय केली जात आहे. सिरोंचा नदी घाटावर सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. पिंडदान करण्यासाठी आवश्यक जागेतही वाढ करण्यात आली आहे. नदीपात्रत भाविकांकडून पिंडदान, दिवे सोडणे, जलपूजा करणे व श्रीफळ वाढविणे अशावेळी निर्माल्य टाकले जाते. हे नदी काठावर सोडण्यात आलेले निर्माल्य गोळा करून तेथील स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
नदी काठावर राबविली स्वच्छता मोहिम : तहसिलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या संकल्पनेतून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिरोंचा घाटावर स्वच्छता मोहिम राबविली. येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न यावेळी केले. मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीमुळे परिसरात कचरा पडत असतो. कचरा हा कचराकुंडित टाका असा संदेशही त्यांनी येणाऱ्या भाविकांना दिला. यावेळी महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, नगरपंचायत विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रशासनाच्या तत्परतेने बुडणाऱ्या मुलाचे वाचले प्राण : श्रीकाकुलांम, आंध्रप्रदेश येथून आलेल्या कुटुंबातील गुडला अरुण तेजे हा 7 वर्षे वयाचा मुलगा सकाळी 9.30 वाजता सिरोंचा घाट येथील प्राणहिता नदीवर पवित्र स्नानासाठी गेला होता. यावेळी पोहत असताना पाण्याची खोली असलेल्या ठिकाणी गेला आणि बुडाला. त्यानंतर काठावर उपस्थित आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक व पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षितरित्या त्याला वाचविले. त्यांनंतर त्याच्यावर घाटावर असलेल्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला दवाखान्यातून सोडण्यात आले.
चालू न शकणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा : पुष्कर दरम्यान वृद्ध, दिव्यांग तसेच इतर कारणाने चालु न शकणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळावर खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. तसेच गरजेनुसार स्वतःचे वाहन पोलीस प्रशासन नदी घाटापर्यंत जाण्यास मुभा देत आहे. परंतु या बाबतचा पुरावा सादर करणे भाविकांना अनिवार्य आहे. कित्येक भाविकांकडून नदी घाटापर्यंत वाहन नेण्याची मागणी वारंवार केली जात आहे. परंतु आवश्यक आणि गरजूंना ती सोय उपलब्ध होण्यासाठी विनाकारण वाहन नदी घाटापर्यंत नेण्यास इतरांनी मागणी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच चालू न शकणाऱ्या किंवा नदीपात्रात स्नान करू न शकणाऱ्या भाविकांसाठी नदीघाटावर आंघोळीसाठी शॉवर बसविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी भाविकांना नदीपात्रात न उतरता त्याच पाण्यामध्ये अंघोळ करता येईल.
भाविकांसाठी आरोग्य सेवा – जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सिरोंचा घाटावर व नगरम घाटावर तात्काल आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य बुथ दवाखाना सुरू केला आहे. पुष्कर सुरु झाल्यापासून १०८ जणांना आवश्यक मदत दिली आहे. यामधे ७२ पुरुष, ७३ महिला व ६ बालकांचा समावेश आहे. यात ३९ वृद्धांचा समावेश आहे. अंग दुखी, बीपी, मधुमेह, हागवण, ऊष्माघात अशा रुग्णांचा समावेश आहे.