आधार विश्व संस्थामुळे कोरोनाच्या भयावह परिस्थितीतून आपण पुन्हा उभे राहिलो : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

181

– कोरोना योद्धांचा सत्कार
The गडविश्व
गडचिरोली : आधार विश्व संस्थेने समाजाला खरा आधार दिला. कोरोना काळात रुग्णांचा दर कमी झाला त्याचे श्रेय आधार विश्व सारख्या संस्थेला द्यावे लागेल. अशा संस्थांमुळे देश पुन्हा उभा राहिला आहे. जेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेला आधार विश्व या संस्थेचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आधार विश्व फाउंडेशनच्या वतीने कोरोना योध्दांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता ताई हिंगे, सचिव प्रा. सुनिता साळवे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत गुलाबराव दोंदल उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करताना आधार विश्व संस्थेच्या अध्यक्षा गीता ताई हिंगे म्हणाल्या, कोरोना काळात आम्ही अनेक उपक्रम राबवले. घरोघरी डब्बे देण्यापासून हा उपक्रम सुरू झाला. अनेकांच्या जेवणाची सोय आम्ही करू शकलो याचे आम्हाला समाधान आहे. याच काळात आम्ही पाहिले की स्मशानभूमीत शवाला अग्नी दिल्यानंतर त्या व्यक्तीचे साहित्य नदीत सोडून देतात त्यामुळे नदीतील पाणी दूषित होते आणि ते पाणी आपणही पितो त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तेव्हा असे न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत गुलाबराव दोंदल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुदीप रंगुवार रा. कमलापूर, चांगदेव फाये कुरखेडा, प्रतिक मुधोळकर, मीरा कोलते,परिचारिका, अंजू यावले परिचारिका, माया भगत कक्ष सेविका, महेंद्र ब्राह्मणवाडे, उज्वल तिवारी इत्यादी कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे संचालन विजया मुने तर आभार प्रा.विद्या कुमरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here