आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी साधला कृषी क्षेत्रातील महिलांशी संवाद

176

– कृषी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
The गडविश्व
पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षीच्या ‍८ मार्च २०२२ आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मंत्री (कृषि) ना. दादाजी भुसे यांनी कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये मा.राज्यमंत्री (कृषि) डॉ.विश्वजित कदम, मा.प्रधान सचिव (कृषि व पदुम) एकनाथ डवले, मा.आयुक्त (कृषि) धीरज कुमार हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे व उपस्थित महिलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा.संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मंत्री (कृषि) ना. दादाजी भुसे यांनी महिलांशी संवाद साधत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेती व शेतीवर आधारित पूरक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. परंतु केवळ १४ टक्के महिलांच्या नावावर शेती आहे व महिलांच्या नावावर शेती नसल्याने विविध शासकीय योजनांपासून त्या वंचित राहतात. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत प्रत्येक योजनेमध्ये महिलांसाठली ३० टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. तसेच ७/१२ उताऱ्यावर महिलांचे नाव लागण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे. त्यांना सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. विविध योजना, उपक्रम, प्रशिक्षण, चर्चासत्र, मेळावे यामध्ये महिलांचा सहभाग वाढविला जात आहे. कृषि मालाची विक्री व्यवस्था करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र विंग स्थापन केलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसून येतील.
मा.आयुक्त (कृषि) यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला शेतकरी वर्ष यांचे अनुषंगाने महिला धोरणाचा कच्चा मसुदा तयार केलेला आहे असे सांगितले. महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. त्यांचा गौरव व प्रतिक म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना “Break the Bias” ही असुन कृषि क्षेत्रामध्ये Technology and Education ही या दोन अस्त्रांचा वापर करुन सर्व योजना प्रभावीपणे अंमलात आणणार आहेत. या दिनाचे औचित्य साधून कृषि क्षेत्रात जास्तीत जास्त महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे प्राधान्याने महिला शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे, महिला शेतकरी गट यांना अधिकाधिक प्रोत्साहन देणार आहे असे आश्वासन दिले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी आपले मनोगत सांगितले तसेच त्यांचे अनुभवातून इतर महिलांना मार्गदर्शन केले. श्रीमती प्रतिभा चौधरी, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी यांनी महिलांचा विविध समित्यांमध्ये सहभाग वाढविणे, त्यांच्या उत्पादित मालासाठी विक्री व्यवस्था निर्माण करणे याबाबत माहिती दिली. श्रीमती अनिता माळगे यांनी महिलांना एकत्र करुन यशस्विनी ॲग्रो प्रोडयुसर कंपनीची स्थापना करुन त्या अंतर्गत विविध प्रक्रिया उद्योग उभारुन यशस्विनी नावाचा ब्रँड तयार केला व यातून सर्व महिलांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी महिलांचे शेतीतील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होऊन नवीन तंत्रज्ञान, अवजारे यांचा विकास व्हावा तसेच कृषि पदवीधारक महिलांना कृषि प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण मिळावे असे सांगितले. श्रीमती वैशाली पाटील यांनी खपली गहू लागवड तंत्रज्ञान तसेच त्याचे वाढते क्षेत्र व विक्री व्यवस्थेची सोय करणे याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती सविता येळणे यांनी सेंद्रिय शेती शेतकरी ते ग्राहक थेट विक्री याबाबत त्या करीत असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. श्रीमती सविता चव्हाण यांनी स्वत:च्या शेतामध्ये शेतामधील पिकांची पॅकिंग करुन विक्री करणे याबाबत माहिती दिली. श्रीमती शारदा कागदे यांनी नर्सरी उद्योगाबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर लाईव्ह प्रसारित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना सुळ, तालुका कृषि अधिकारी, खालापूर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रितम आगलावे, तंत्र अधिकारी, माहिती विभाग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here