अतिदुर्गम भागात दळणवळण सद्यस्थिती बिकटच का ?

251

आंतरराष्ट्रीय मूळनिवासी दिन विशेष

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवर कधीकाळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानवप्राण्याची उत्क्रांती झाली, असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानवप्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करून गेला. नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत तो अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासानंतर शब्द, बोली आणि भाषा, संवाद, अशी उत्क्रांती होत गेली. तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी-परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरून आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढीपरंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.
जगात समाजव्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. १९व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून २४ ऑक्टोबर १९४५ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला. संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या १९२ इतकी आहे, ते एकत्र आले. सीमा प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल पन्नास वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळनिवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळनिवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने दि.९ ऑगस्ट १९९४ रोजी विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे, याला सुरुवात झाली. जागतिक स्तरावर या हालचाली खुप विलंबाने झाल्या. भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर दि.२६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका दृष्टिक्षेपात ठेवून तरतूद करण्यात आली होती. स्वातंत्र्यलढ्यात ते प्राणपणाने वाले, मात्र त्यांचा इतिहास दडवून ठेवण्यात आला. त्यात अग्रणी शूरवीर बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, तंट्या भिल्ल, झलकारी बाई, आदींचा सक्रिय सहभाग होता. आता तो प्रेरणादायी इतिहास कसा बरे पुढे येत आहे?
आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा व सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजकाळात त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडे गेले. त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने या समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुखसूत्र त्यांची संस्कृती, प्रथापरंपरा यांचे जतन, संवर्धन करणे आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हीत, रुढीपरंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपापसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यात आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही, इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण ज्यात सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे. जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी व गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन आदी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत. संविधानाने समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यात विशेष तरतूद आहे. यासाठी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ लागू करण्यात आलेला आहे. अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे, याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. विधानसभेत व लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे, यासाठी आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करून हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासीबहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने कागदावर सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात नाहीच्याच बरोबर! विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करून दिली जात आहेत. केवळ इतके करून होत नाही, तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी, यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षण देखील आता नव्याने सुरू होत आहे.
याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्यसुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळणवळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, बडा माडिया, हलबी, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळभाषा आहे, यात माडिया व गोंडी या दोन मुख्यभाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळभाषा असणाऱ्या गोंडी, माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल? याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे व समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली दिसते. भारतातील एकूणच बहुजन समाज हा मूळनिवासी आहे. महार, मांग, चांभार, मादगी, कोळी, कुणबी, मराठा, माळी, तेली, कोष्टी, धोबी, न्हावी, लोहार, कुंभार, सोनार, गवळी आदी सर्व समाज मागासलेच आहेत. हे समाजबांधव काही समुद्र ओलांडून आले नाहीत किंवा त्यांचे अवतारही झाले नाहीत. मूळनिवासींना ढाल करून काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला मूळनिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका, असे ठणकावून छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करून आता विकास वाटेवर वाटचाल सुरू झाली आहे, असेच या दिनाच्या औचित्याने म्हणता येईल.

!! The गडविश्व परिवारातर्फे विश्व आदिवासी दिनाच्या सर्व आदिम समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा !!

संकलन: श्री एन. के. कुमार गुरूजी.
रामनगर- गडचिरोली.
मोबा. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here