– गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने, गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील २५ युवक-युवती व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आज १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे होत असलेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये ४२ कि.मी (फुल मॅरेथॉन), २१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन) व १० कि.मी. मॅरेथॉन करीता सहभाग नोंदविला.
मुंबई येथे दरवर्षी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्रातील अतीदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी ६४ पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर २५ युवक-युवतींची निवड करुन गडचिरोली पोलीस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहीत्य वाटप करुन राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ प्रशिक्षकांकडुन योग्य सरावाचे नियोजन करुन दोन महिण्याचे निवासी प्रशिक्षण पोलीस मुख्यालय येथे देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरीता कसुन सराव घेण्यात आला. यामध्ये 21 किमी, २५ किमी, ३५ किमी व ४२ किमी. धावणे, स्टेन्थनिंग एक्सरसाईज, एबीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज इ. शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धमध्ये २१ किमी. गटात गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, पोउपनि. विश्वंबर कराळे, परिपोउपनि. ईश्वर सुरवासे, अविनाश कांदो, उमेश मट्टामी, मुकेश रापंजी, नयन गुरनुले, सौरभ कन्नाके, प्रमोद पुराम, राकेश तुलावी, सादु कांदो, ओंकार दर्रो, स्वप्निल गुरनुले, अमित कावळे, सुरज बोटरे, अमोल मडावी, तुषार गावतुरे, श्रेयस वाढई तसेच अमोल पोरटे (४२ किमीमध्ये ३ तास, २४ मी.) आणि २१ किमी. या गटात पोअं लिलाधर खरबनकर, रोहन भुरसे (२१ किमीमध्ये १ तास, १९ मी.), प्रियंका ओक्सा (२१ किमीमध्ये १तास, २८ मी.) व साक्षी पोलोजवार (२१ किमीमध्ये १ तास, ४५ मी.), पोअं नाजूक मोहुर्ले (१० किमीमध्ये ३९ मी. १३ सेकंद) यांनी सहभाग नोंदविला. आज झालेल्या मुंबई येथील टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी सहभाग नोंदवून गडचिरोली येथील युवकांचा उत्साह वाढविला.
टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीचे युवक सहभागी झाले यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार तसेच प्रशिक्षक श्रेणी.पोउपनि/जांगी यांनी अथक परिश्रम घेतले.
