‘काम करा, कमवा व शिका आणि पीजी डिप्लोमा मिळवा’ : “स्पार्क” अभ्यासक्रम काय आहे ?

984

– अशी आहे शैक्षणिक पात्रता
– अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष समाजसेवेसाठी चाकोरी बाहेरील शिक्षणपद्धती
The गडविश्व
गडचिरोली, ९ मे : ‘सर्च’ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या “स्पार्क” (ग्रामीण सामाजात व्यसनांविरोधी सामाजिक कार्यक्रम) या एक वर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे शिक्षण लवकरच येत्या जुलै मध्ये पूर्ण होत आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी या एक वर्षीय अभ्यासक्रमाला रीतसरपणे सुरुवात करण्यात आली होती. ‘काम करा, कमवा व शिका आणि पीजी डिप्लोमा मिळवा’ तसेच कृती सोबत ज्ञान आणि कौशल्याची जोड ही या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहेत. नयी तालीम शिक्षण पद्धतीवर हा अभ्यासक्रम आधारित आहे. व्यसनावर काम करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ अभियानात प्रत्यक्ष काम करता करता क्षमता व कौशल्य विकसीत करणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वर्ष २२-२३ या सत्रासाठी विविध जिल्ह्यांतून आलेले १३  उमेदवार सदर अभ्यासक्रम मागील ९ महिन्यापासून पूर्ण करत आहेत. वर्ष २३-२४ बॅचची सुरवात १ ऑगस्ट २०२३ पासून होईल.
यावर्षी करिता प्रवेश घेतलेल्या या १३ उमेदवारांना गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात मुक्तिपथ प्रकल्पात कार्यकर्त्यासोबत समाजातील व्यसनाच्या प्रश्नावर काम करण्यासाठी नेमण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावात रोज जाऊन तसेच गरजेनुसार गावात मुक्काम करून नियोजित पद्धतीने हे उमेदवार सामाजिक कृती करत करत अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. सर्च येथे तज्ञ व्यक्तीद्वारा यांना दर दोन महिन्यात एकदा थिअरी, उदाहरणार्थ समुदायातील व्यसनाचे प्रमाण कसे मोजावे, आरोग्य विषयाचे संदेश साहित्य तयार करणे, लोकांचे संघटन करणे, अहिंसक सामाजिक कृती, प्रशासनासोबत काम करणे, व्यसन उपचार व पाठपुरावा, कार्यक्रमाचे मूल्यांकन इत्यादी विविध घटकांवर प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण मिळालेल्या विविध विषयाबाबत कृती करण्याचे तसेच कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करायला हे विद्यार्थी शिकले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आतापर्यंत त्यांना दिलेल्या तालुक्यात किमान १०० गाव भेटी व किमान ५० व्यसनउपचार कार्यक्रम तालुक्याच्या व गावाच्या ठिकाणी पूर्ण केले आहेत. शेवटी व्हायव्हा व अभ्यास निबंध पूर्ण करून घेतला जाईल व आवश्यक परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ द्वारे पीजी डिप्लोमा देण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कामाच्या विविध नव्या संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. इतर संस्था किंवा संघटना करिता व्यसनाच्या प्रश्नावर काम करण्यासाठी प्रशिक्षित व तयार कार्यकर्ते स्पार्कच्या माध्यमातून मिळणार आहेत.
मास्टर ऑफ सोशल वर्क, एम.ए. समाजशास्त्र, किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेले तसेच बँचलर ऑफ सोशल वर्क + 2 वर्ष कामाचा अनुभव अशी या अभ्यासक्रमासाठी पात्रता आहे. इतर कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
या अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक मंडळात डॉ.अभय बंग(अध्यक्ष), डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विवेक सावंत (MKCL), डॉ. विक्रम पटेल (हार्वर्ड विद्यापीठ), डॉ.शालिनी भरत (कुलगुरू, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) व डॉ. सुदर्शन अय्यंगार (माजी कुलगुरू, गुजरात विद्यापीठ) हे आहेत. सर्च चे तुषार खोरगडे हे अभ्यासक्रमाचे संयोजक असून संतोष सावळकर व तपोजेय मुखर्जी (मुक्तिपथ) व प्रा. डॉ. शशिकांत आसवले गोंडवाना विद्यापीठ यांच्या समितीच्या देखरेखी खाली हा अभ्यासक्रम सुरु आहे.
सत्र २३-२४ वर्षाच्या प्रवेशाची लिंक/साईट लवकरच जाहीर केल्या जाणार असून या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी सर्व युवां व युवतींना ‘गोंडवाना विद्यापीठ’ व ‘सर्च’ संस्थेद्वारा आवाहन करण्यात येत आहे.

स्पार्क माहिती करिता वेबसाईट :- www.searchforhealth.ngo

– माझे एम.एस.डब्ल्यू चे बरेचसे शिक्षण पुस्तकात झाले. स्पार्क या अभ्यासक्रमात काम करतांना  स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली, लोकांच्या अधिक जवळ जाऊन अडचणीचे निराकरण कसे करायचे ते या अभ्यासक्रमात शिकता आले, रचनात्मक कार्यक्रम काय असते याची जाणीव झाली, महत्त्वाचे म्हणजे काम करण्याची आवड व जिद्द निर्माण झाली.
– (राहुल महाकुलकर, स्पार्क विद्यार्थी धानोरा तालुका)

 – सुप्त गुणांना चालना मिळाली, निडर होऊन काम करणे शिकले. निर्णय घेणे, पुढाकार घेण्याचे धाडस निर्माण झाले. सहयोग, संवाद, प्रक्रिया शिकता आली, ग्रामपंचायत, ग्रामसभा, पोलीस प्रशासन यांचे सोबत कसे काम करावे हे शिकले. अशा विविध गोष्टी मला शिकायला मिळाल्या. शिकता शिकता कमाई, म्हणजेच स्वावलंबन आले.
– (पल्लवी राउत स्पार्क विद्यार्थी, आरमोरी तालुका)

(The gdv, the gadvishva, spark, muktipth, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here