निराधारांना न्याय मिळण्यासाठी चळवळ उभी करणार : रामदास जराते

54

– तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे ठिय्या आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : वयोवृध्द, विधवा, परितक्त्या, निराधार जनतेविषयी शासन असंवेदनशील भावनेने काम करत असून हा अन्याय दूर करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात निराधारांच्या न्यायासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी चळवळ उभी करु, असा इशारा निराधारांच्या ठिय्या आंदोलना दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी दिला.
तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक ५ हजार रुपये पेंशन देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शने आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डाॅ. गुरूदास सेमस्कर, भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबणवाडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, चंद्रकांत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रावणबाळ निराधार, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार व विधवा परितक्त्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य गेले सहा महिण्यापासून वेळेवर देण्यात आलेले नाही ते तातडीने देण्यात यावे. हजारो लाभार्थी पात्र असूनही या योजनांचा लाभही मिळाला नाही त्यांना योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा. रोजगार हमी योजनेची मजूरी सुध्दा वेळेवर देण्यात यावी. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान‌ सन्मान योजनेचे अनुदान तातडीने देण्यात यावे, धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, गडचिरोली शहरातील संघर्षनगर, इंदिरानगर, शाहूनगर, गोकूळनगर, विवेकानंदनगर, विसापूर भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना घराचे कायमस्वरूपी पट्टे देवून नगरपरिषद तर्फे घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, या आणि अशा विविध मागण्यांचा यात समावेश होता.
सदर ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येवून नायब तहसीलदार हलमारे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी योगाजी चापले, देवेंद्र भोयर, भास्कर ठाकरे, विलास भोयर, महागू पिपरे, छाया भोयर, रजनी खैरे, संगीता चांदेकर, आझाद चे पदाधिकारी सतिश दुर्गमवार यांच्यासह शेकडो निराधार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here