पोमके मुरूमगाव येथे वीर बिरसा मुंडा ई-लायब्ररी, शहीद गेंद कुवर सार्वजनिक वाचनालय लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न

143

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० मे : गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये लोकशाही व शांततेच्या मार्गाने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असणाऱ्या समाजाचा विकास होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम राबवले जात असतात. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून दुर्गम भागातील विद्यार्थी युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच राज्य शासन व केंद्र शासन यांनी निर्माण केलेल्या रोजगार व नोकरीच्या संधी गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना मिळावी याकरिता पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मुरूमगाव येथे वीर बिरसा मुंडा निशुल्क ई लायब्ररी व शहीद गेंद कुवर निशुल्क सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. ८ मे रोजी सदर इ लायब्ररी व सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर वीर बिरसा मुंडा ई लायब्ररी चे उद्घाटन मुरूमगावचे सरपंच शिव प्रसाद गवरना यांचे हस्ते व शहीद गेंद कुवर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संदीप जितुराम उमरिया व गौतरसिंग परेदिया यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बनसोडे प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, श्रीमती लताताई पुंगाटी माजी जि. प. सदस्य, सौ.कवाडकर मॅडम महिला बचत गट, सौ. प्रज्ञा मेश्राम मॅडम महिला बचत गट, हर्ष आश्रम शाळा मुरूमगाव, सौ.शिंदे मॅडम आश्रम शाळा मुरूमगाव, संतोष मलिया पोलीस पाटील बेलगाव, मुनीर भाई शेख समाजसेवक, असिस्टंट कमांडट यादव सीआरपीएफ बटालियन 113, पोलीस निरीक्षक मते एस आर पी एफ दौंड ग्रुप हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद गेनकुवर चेनसिंग परेदिया व भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तत्पुर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करून दिंडी संपूर्ण गावात फिरविण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्याला गावातील महिला -पुरुष, विद्यार्थी, युवक युवती वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक मिथुन शिरसाठ व पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे यांनी मेळाव्यास उपस्थितांना मार्गदर्शन करून वाचनाचे महत्त्व पटवून दिले तसेच तयार करण्यात आलेल्या ई लायब्ररी व वाचनालयाचा उपयोग जास्तीत जास्त युवकांनी घेणेबाबत आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले व पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
उपस्थित नागरिकांना अल्पोहाराची व्यवस्था करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वाचनालयासाठी पुरविण्यात आलेली सुविधा

सुसज्ज हॉल ( विद्युत जोडणी फॅन, टूयब लाइट , पडदे, वॉशरूमची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा), पुस्तके ठेवण्यासाठी कपाट ०३, मोठे टेबल- ०४, खुर्ची- ३०, महापुरुषांच्या प्रतिमा ०५, वाचन उपयोगी पुस्तके – पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, वनविभाग भरती, आर्मी भरती ,एमपीएससी व राज्यसेवा यासाठी लागणारी सर्व अत्यावश्यक पुस्तके, भारत,महाराष्ट्र,आणि गडचिरोली जिल्ह्याचे नकाशे, भिंतीवरचे घड्याळ, सूचना बोर्ड, ब्लॅक बोर्ड

ई लायब्ररी साठी पुरविण्यात आलेली सुविधा

सुसज्ज हॉल, फॅन ट्यूबलाइट, कम्प्युटर- ०३, लॅपटॉप -०१, टॅब ०१, टेबल ०४, खुर्ची १०, एक प्रोजेक्टर पडद्यासह, बाथरूमची सुविधा व पिण्याच्या पाण्याची सुविधा, ई लायब्ररी कम्प्युटरमध्ये अनेक ऑनलाईन ऑफलाइन स्पर्धा परीक्षेची व अवांतर वाचण्याची पुस्तके उपलब्ध, ई लायब्ररी वापरणे व मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक मिथुन शिरसाठ, पोउपनि गणेश आठवे, पोउपनि सचिन ठेंग, तसेच पोलिस मदत केंद्र मुरूमगाव येथील सर्व अंमलदार आणि एस आर पी एफ चे अंमलदार यांनी परिश्रम करून सदरचे ई लायब्ररी व सार्वजनिक वाचनालय निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here