“गडचिरोली आय.टी.आय.मध्ये सुरू होणार ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम”
– महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गडचिरोली येथे लवकरच ‘ट्रॅक्टर टेक’ हा अत्याधुनिक व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात यासाठी सामंजस्य करार झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या उपक्रमातून जिल्ह्यातील युवकांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री व ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडेल.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत हा करार करण्यात आला. या प्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #TractorTech #Mahindra #SkillDevelopment














