– परिसरात भीतीचं वातावरण, तेंडुपत्ता तोंडणाऱ्यामध्ये दहशत
The गडविश्व
मूल, दि. १२ : चंद्रपूर जिल्ह्यातील भादुर्णा येथील बफर झोनमधील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघांचे प्राणघातक हल्ले सुरूच असून, केवळ तीन दिवसांत दुसऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. भुमेश्वरी दिपक भेंडारे (वय ३२, रा. भादुर्णा) असे आजच्या घटनेतील मृत महिलेचे नाव असून, तिने तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावले.
ही घटना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. भुमेश्वरी ही मूळची भादुर्णा येथील असून, तिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे यांच्याशी झाला होता. काही काळ तेथे राहिल्यानंतर ती माहेरी परतली होती. पतीसोबत मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. सोमवारी ती पती, आई आणि वडिलांसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली असता वाघाने अचानक झडप घालून तिचा जीव घेतला.
घटनास्थळी तिच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता वाघ जंगलात पळून गेला. घटनेनंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
१० मे रोजीही याच परिसरातील मेंढा माल जंगल भागात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे तीन दिवसांत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, वनविभागाकडून निष्क्रियतेचा आरोप होत आहे. “सतत वाढणारे वाघाचे हल्ले थांबवा, महिलांच्या जीवाशी खेळ थांबवा!” अशी जोरदार मागणी होत आहे. ग्रामस्थांनी बाधित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यासह तेंदूपत्ता कामांदरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे.
या घटनांनी वाघ मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन आणि वनविभागाने तत्काळ ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून दिला जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #tigeratyack #tadobaforest #tadobajungal #mulnews )