संवाद उपक्रमाच्या माध्यमातुन महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी प्रवेशित संस्थेत रात्री मुक्काम करुन समस्या जाणून घेणार
The गडविश्व
गडचिरोली, दि.१३: राज्यातील प्रत्येक जिल्हयात महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत राज्यात बालगृह, निरिक्षणगृह, वॅन स्टाप सेंटर, स्त्री आधार केंद्र, स्वाधार गृह चालवले जातात. यामध्ये काही सामाजिक संस्थेतर्फे तर काही महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही संबधीत संस्थाकडे दिलेली असते. सदर संस्थेमध्ये आवश्यक पुरेशा सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्याची नोंद घेवून महिला व बाल विकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील 36 जिल्हयात संवाद उपक्रम राबविण्याचा नविन उपक्रम हाती घेतला असून सदर उपक्रमामुळे संस्थेमधुन लाभार्थ्यांला मिळणाऱ्या सोई सुविधा यावर वाच ठेवला जाणार आहे. सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही योजना राबविली जाणार आहे.
गडचिरोली जिल्हयात बालकांच्या व महिलांच्या संस्थामध्ये सखी वॅन स्टॉप सेंटर, गडचिरोली, लोकमंगल संस्था व्दारा संचालीत अहिल्यादेवी बालगृह घोट, ता. चामोर्शी, लोकमंगल संस्था व्दारा संचालीत स्वाधारगृह घोट ता. चामोर्शी, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह व बालगृह गडचिरोली हे चार केंद्र कार्यान्वीत असून या संस्थेमध्ये किमान महिण्यातुन एक मुक्काम करुन तेथील दाखल असलेल्या प्रवेशितांसोबत संवाद साधणे, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेणे, जेवण, स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, आरोग्यविषयक काळजी, आदी समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी महिण्यातुन एकदा रात्री मुक्काम करणार आहेत.
महिला व बाल विकास आयुक्त, प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन संपूर्ण राज्यात संस्थेमधील प्रवेशित बालके व महिला यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता संवाद उपक्रम जिल्हयात राबविल्या जात असून यामधुन संस्थेमध्ये अनुचीत प्रकार दिसून आल्यास कायदेशिररीत्या कार्यवाही करुन संस्था मान्यता रदद करण्यात येईल अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी दिली आहे.