The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या उडेरा येथे विदेशी दारूची विक्री बंद असून हि बंदी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवकांनी सांगितले. मुक्तिपथ तर्फे दोन दिवशीय सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास २० हजारांचा दंड वसूल करण्याचे ठरविण्यात आले.
उडेरा या गावात पूर्वी विदेशी दारूची विक्री केली जात होती. त्यामुळे युवकांसह लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले होते. अशातच मुक्तिपथ तर्फे वारंवार गावात बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांना जागृत करण्यात आले. त्यांनतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अवैध दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेत गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. सध्यस्थितीत गावातील विदेशी दारूची विक्री बंद आहे. दरम्यान, मुक्तिपथ तर्फे गावांमध्ये दोन दिवशीय सघन भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने ही अवैध दारूविक्रीबंदी कायम ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. ग्रामसभेमध्ये अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याकडून २० हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील विदेशी दारूविक्री बंदीसह घरगुती दारूबंदी करण्यासाठी युवक व गाव संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, गावात स्त्री आरोग्य शिक्षण घेण्यात आले. यामध्ये महिलांना खर्राचे व्यसन न करण्याचे व आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे पटवून देण्यात आले. युवक-युवतींची बैठक घेऊन गाव विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत तोडसापट्टी इलाका अध्यक्ष गोंगलू गावडे, उपसरपंच बापू गावड़े, पोलिस पाटिल लीला राजू गावडे, आशा वर्कर दीपा झाड़े, अंगणवाडी सेविका अर्चना धुर्वा, ग्राम विकास अधिकारी पी पी निंदेकर, अध्यक्ष बीचेबाई कंगाली, बचतगट अध्यक्ष राजेश्वरी नक्कलवार, सुरेश झाड़े, रामां गावड़े व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )