गडचिरोलीत स्किल क्रांतीची सुरुवात : लॉयड्सच्या LMGSE मिशनने 300 युवकांना दिली नव्या भविष्याची गॅरंटी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोलीला ‘ग्लोबल स्किल सिटी’ बनवण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल टाकत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अॅंड एंटरप्रेन्योरशिप’ (LMGSE) चे लोकार्पण केले. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण, स्किल डेव्हलपमेंट चेअरपर्सन अल्झा मिश्रा, LICL चे एमडी व्यंकटेश संधिल आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने गडचिरोलीच्या कौशल्य क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली.
युवकांना संबोधित करताना प्रभाकरण म्हणाले की, ‘गडचिरोलीला जमशेदपूरपेक्षा मोठे स्टील सिटी बनवण्याचे आमचे ध्येय असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या सकारात्मक पाठबळामुळे हा परिवर्तनाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल.’ वेल्डिंग, प्लंबिंग, ट्रान्सपोर्ट, मेकॅनिकल अशा विविध तांत्रिक प्रशिक्षणांमधून येथील युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोजगारसंधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
LMGSE अंतर्गत दहा आठवड्यांच्या या कार्यक्रमात 45 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि 45 दिवसांचे ऑन-जॉब ट्रेनिंगचा समावेश आहे. पहिल्या तुकडीतील 300 युवकांनी बार-बेंडिंग आणि शटरिंग या उच्च मागणीच्या ट्रेड्समध्ये प्रशिक्षणास सुरुवात केली असून, पहिल्याच वर्षात तब्बल 10,000 युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी गती मिळून गडचिरोलीच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया रचला जाणार आहे.
LMGSE मिशनची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची सर्वसमावेशकता. महिलांसह समाजातील वंचित घटकांना हरित उद्योग, लॉजिस्टिक्स आणि विविध आधुनिक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्थिर आणि सन्माननीय करिअरची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या मिशनमध्ये बांधकाम, पायाभूत सुविधा, मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल ट्रेड्स, अक्षय ऊर्जा, ऑटोमोबाईल सेवा, फ्रंटलाइन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात उद्योगसुसंगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष सराव, उद्योगमान्य प्रमाणपत्रे आणि प्लेसमेंट यांमुळे प्रशिक्षणानंतर युवकांना रोजगाराची थेट दारे खुली होतील.
LMGSE चा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे लॉजिस्टिक्स आणि ड्रायव्हिंग उत्कृष्टता केंद्र. HMV ड्रायव्हिंग, 40 फूट ट्रेलर ड्रायव्हिंग आणि महिलांसाठी विशेष थ्री-व्हीलर प्रशिक्षणाद्वारे 4,000 हून अधिक व्यावसायिक ड्रायव्हर्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उद्योगसंलग्न प्लेसमेंटमुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
लॉयड्सच्या या मिशनमुळे गडचिरोलीच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. स्थानिक युवकांना जागतिक संधींच्या दारात घेऊन जाणारे हे कौशल्य अभियान गडचिरोलीला प्रगत, सक्षम आणि आधुनिक कौशल्य केंद्र बनवण्याच्या दिशेने निर्णायक ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













