– सर्वांसमोर निर्माण केला आदर्श
The गडविश्व
भंडारा, ११ जुलै : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पागोरा येथील विद्यार्थ्यानी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावच्या ग्रामपंचायतच्या ज्या सभागृहात काही लोक जुगार खेळायचे त्या ठिकाणी गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती अभ्यासिका सुरू केली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.
ग्रामस्थानी आदिवासी माना जमातीचा पारंपारिक उत्सव असलेल्या नागदिवाळी सन साजरा केला. दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बंडू चौधरी आणि आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नामदेव घोडमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी सण उत्सव साजरे करण्यासोबतच गावात काही रचनात्मक आणि शाश्वत काम सुरू करता येईल का ? असा सवाल गावकऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर गावातील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी याला सकारात्मक घेत अभ्यासिका सुरू करण्याची इच्छा दर्शवली. अभ्यासिका सुरू करत असताना गडचिरोली जिल्ह्यात वाल्मीक नन्नावरे यांनी सुरू केलेली ज्ञानगंगा अभ्यासिकेचे उदाहरण सर्वांसमोर होतेच. त्यानंतर या गावात सभेचे आयोजन करण्यात आले व या अभ्यासिकेसाठी ग्रामपंचायतीने ज्या ठिकाणी काही लोक जुगार खेळायचे ते सभागृह विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावातील सरपंच आणि सदस्य व इतर लोकप्रतिनिधींची शिक्षणाविषयी आवड वाखाणण्याजोगी आहे. या अभ्यासिकेला गावातील पुरुषांसोबतच महिलांचेही विशेष सहकार्य आहे.या अभ्यासिकेत गावातील सर्व जाती धर्माचे ३५ विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या विद्यार्थ्यांना १२ वी शिकलेला श्रेयस आणि ११ वी शिकत असलेली साक्षी गणित शिकवते आणि त्यांचा सराव करून घेते. १२ वी शिकणारी प्राची विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवते. पदवीच्या प्रथम वर्षाला असलेली सलोनी आणि नर्सिंगचे शिक्षण घेत असलेली कल्याणी इंग्रजीचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेते. ११ वी शिकत असलेली साक्षी मराठी आणि इंग्रजी शिकवते, समीक्षा गृहपाठ करून घेते तर नवव्या वर्गात शिकत असलेली तेजस्विनी अंगणवाडीच्या मुलांना शिकवते.

उपक्रमाचे कौतुक
या अभ्यासिकेच्या कामावर प्रभावित झालेले मॅजिक आणि ज्ञानगंगा अभ्यासिकेचे मुख्य संयोजक वाल्मीक ननावरे, साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी आणि ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे यांनी ३ जुलै रोजी भेट दिली आणि त्यांना ३ हजार रुपये किमतीची पुस्तके आणि आर्थिक मदत केली. तसेच मार्गदर्शन करून गावकरी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी प्राध्यापक बंडू चौधरी, कार्याध्यक्ष नामदेव घोडमारे, प्रा. जांभुळकर, सुभाष शेरकुरे, अनिलजी चौधरी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.