शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे शिक्षक दिन व स्वयंशासन उपक्रम उत्साहात साजरा

33

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : तालुका अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे ०५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा यावर्षीही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडली.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळा कर्मचारी यांच्या भूमिका साकारून शालेय कामकाज पार पाडले. मुलींनी साड्या तर मुलांनी शिक्षकांचा पोशाख परिधान करून शिस्तबद्ध वातावरणात अध्यापन, परिपाठ, हजेरी घेणे, संगणक व शारीरिक शिक्षणाचे तास घेणे इत्यादी जबाबदाऱ्या सांभाळल्या.
मुख्याध्यापिका म्हणून इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कल्पना नैताम हिने सर्व कामकाजाचे शिस्तप्रियतेने संचालन केले. इयत्ता ७ वी चा विद्यार्थी आनंद वड्डे याने शिपाईची भूमिका साकारून लक्ष वेधले. वसतिगृह अधीक्षकाच्या भूमिकेत हर्षल उसेंडी व पल्लवी नैताम यांनी भोजन व आरोग्य व्यवस्थापन केले. तसेच ए.एन.एम. नर्सच्या भूमिकेत नीलिमा हलामी हिने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून आरोग्यविषयक सल्ला दिला.
करिष्मा उसेंडी, मयुरी आचला, साधना गावडे, श्वेता टेकाम, सुष्मिता आत्राम, शालिनी हलामी, काजल गावळे, राशी हलामी, चंचल नैताम, किंजल आचला, पूर्वी कोल्हे, परमेश्वर आचला, भवसागर आमाडार, निखिल मडावी, प्रफुल दुग्गा, गणेश सोरी, आशिष हिडको, सूरज दर्रो आदी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुकरण करत अध्यापन करणे, शिस्तीचे पालन घडवून आणणे या उपक्रमांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कु. डी. वाय. मेश्राम व शिक्षकवृंद तसेच अधीक्षक व अधिक्षिका यांनी कौतुक केले. शेवटच्या खेळाच्या तासिकेत विद्यार्थ्यांनी खेळ शिकविण्याबरोबरच स्वतःही खेळात सहभाग घेऊन उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here