विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत वाचायला आणि वाकायला शिकले पाहिजे : प्रा.नरेंद्र आरेकर

53

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा. दि. ०८ : मोबाईल व संगणकाच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. क्रमिक अभ्यासक्रमासोबतच अवांतर वाचनाने माणूस प्रगल्भ होतो त्यामुळे वाचन संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे. याशिवाय नाचणे, खेळणे हे नैसर्गिक आहे. जन्मलेले प्रत्येक मूल आपल्या बालवयात ह्या क्रिया स्वाभाविकपणे करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उंची गाठण्याकरिता केवळ नाचणे व खेळणे एवढ्या पुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी वाचायला आणि वाकायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.
ज्ञानवर्धिनी इन्स्टिट्यूट फॉर सोशल कॉज (DISC) भामरागड व आदिवासी मुलांचे तथा मुलींचे शासकीय वसतिगृह कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता एकाच छताखाली १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळा व समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना व वैचारिक रुची ठेवणाऱ्या महाविद्यालयेत्तर तरुणांकरिता बौद्धिक विचार मंच उपलब्ध करून देण्याचा पायंडा मागील वर्षापासून या स्पर्धेच्या आयोजनातून घातला गेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नितीन घाटबांधे, कैलास उईके शहर प्रतिनिधी दैनिक नवराष्ट्र, मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल सदाशिव नरताम, पुष्पलता कोकोडे मुख्याध्यापिका अंगारा, ममता जुवारे शिक्षिका, अनिल साळवे नेत्रचिकित्सा अधिकारी व मोरेश्वर खोब्रागडे यांनी अतिथींच्या स्थानावरून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्दिष्टे मुलींच्या वसतिगृहाचे गृहपाल मनिषा वऱ्हाडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश तुलावी व संस्कृती पिंपळे यांनी केले तर पुनम रक्षा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलकंठ मोटघरे, नेहा गजभिये, सचिन मुंगनकर, देवेंद्र धोंडणे,नागराज ढोक,उमेश सयाम, लिना बारसागडे, विद्यार्थी प्रमुख गौरव नैताम, हेमराज दर्रो, प्रधान धुर्वे, ऐश्वर्या हलामी, लवनकुमार नैताम इत्यादींनी सहकार्य केले.
भाषण स्पर्धेत प्रथम विजेती संस्कार पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी विधी बनसोड, द्वितीय विजेती ऋतिका बनसोड, तर थोरवी विद्यालयाची विद्यार्थिनी उज्वला मडावी ही तिसरी विजेती ठरली. वाद- विवाद स्पर्धेत प्रथम विजेता RJV स्कूल ऑफ स्कॉलर विद्यालयाचा विद्यार्थी अर्पित रंगारी, द्वितीय विजेती विधी बनसोड तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी RJV स्कूल ऑफ स्कॉलरचा विद्यार्थी यश मानकर ठरला. गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम विजेता स्वप्निल खोब्रागडे, द्वितीय विजेता विद्याभारती महाविद्यालयाचा ओमकार गोबाडे तर तृतीय विजेती शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह कुरखेडा येथील विद्यार्थिनी कल्याणी उइके ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here