– आमदार डॉ. देवराव होळी यांना जेप्रा वासियांच्या वतीने निवेदन
– विद्यार्थी तसेच आरोग्याच्या दृष्टीने गैरसोय होत असल्याची केली तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑगस्ट : जेप्रा या मार्गावर दिभना, जेप्रा, राजगाटा, राजघाटा चेक ही गावे येत असून जेप्रा हे मोठे गाव मध्यभागी आहे. मात्र या मार्गावर यापूर्वी सुरू असलेली बस सेवा बंद असल्याने गावकरी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही बस तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी जेप्रा येथील सरपंचा सौ. शशिकला ताई झंजाळ व भाजपा नेते देवानंदजी चलाख यांनी गावकऱ्यांच्या वतीने आमदार डॉ.होळी यांना निवेदन देऊन केले.
गावातील लोकांना तालुक्याच्या मुख्यालयी जाण्यासाठी बस सेवा नाही, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नाही, अमिर्झा येथे बँकेचे खाते असल्याने अनेक शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना अमिर्झा येथे ये जा करण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही बस सेवा सुरू करून गावकरी व विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी आमदार डॉ.होळी यांनी निवेदकांना आश्वासित करीत याबाबत तातडीने संबंधित विभागाला पत्र देण्याचे निर्देश दिले.