३१ डिसेंबरला दारुला नाही म्हणा, पहिल्या घोटापासून दूर रहा

613

– ‘मुक्तिपथ’ चे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : नववर्षाची पहाट उंबरठ्यावर आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करा, नव्या संकल्पासह नवीन वर्षाची सुरुवात करा असे आवाहन गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू नियंत्रण करिता सुरू असलेल्या मुक्तिपथ अभियान द्वारा सर्व युवांना करण्यात येत आहे.
देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे ते तरुण दारूच्या नशेत बेभान होऊन नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत बाब अनेक ठिकाणी बघायला मिळते. ३१ डिसेंबरलाच अनेक युवक निमित्त साधून दारूचा पहिला घोट घेतात. अनेक प्रौढ मंडळी सुद्धा यात सामील असते. पण थोडीशी गम्मत म्हणून घेतलेली दारू हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेते. यातूनच सध्या सार्वत्रिक दिसत असलेल्या हिंसा, अत्याचार, अपघात अशा घटना जन्म घेतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच विशेषतः युवांनी आणि इतर सर्वांनी दूर राहणे गरजेचे आहे.
दारू पिल्याने आनंद मिळतो हा सर्वात मोठा गैरसमज आजच्या युवा पिढीमध्ये प्रचलित आहे. आणि मग आनंद मिळण्यासाठी तरुण पिढी दारुकडे वळते. त्यांचे आवडते फिल्मस्टार देखील त्यांना चित्रपटांमध्ये दारू पिताना दिसतात. पण आज आनंद देणारा पहिला प्याला पुढे दुःखाची लाट घेऊन येतो. कारण दारूचा पहिला प्याला व्यसन लावतो आणि एकदा व्यसन लागले की माणूस दारुला नाही तर दारूच माणसाला पिते. आणि यासाठी निमित्त ठरते ३१ डिसेंबर. त्यामुळे दारूच्या पहिल्या थेंबालाच नाही म्हणा. नवीन वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन मुक्तिपथ अभियान द्वारा करण्यात येत आहे.
नवीन वर्षाची सुरुवात दारूच्या नशेत झिंगून करण्याची विकृत संस्कृती या काही वर्षात सुरू झाली आहे. पण नशेत बेभान होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात कुठलाच शहाणपणा नाही. त्यामुळे युवा वर्गासह सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करावे, असे आवाहन मुक्तिपथच्या वतीने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here