The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : सम्यक ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीची वार्षिक आमसभा तथा मार्गदर्शन शिबिर येथील सम्यक बुद्ध विहाराचे सभागृहात नुकतेच पार पडले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती आर.आर.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, दंतरोगतज्ञ डॉ.अंकिता धाकडे हेप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कवडूजी उंदीरवाडे याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती पाटील म्हणाले की , ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी विधीसेवा प्राधिकरणामार्फत अनेक सोयी पुरविल्या जातात. या सोयीसुविधांचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.दावल साळवे यांनी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य सुविधाची माहिती देऊन या सुविधा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. आजारादरम्यान त्याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गडचिरोली शहरात लवकरच तीन नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
डॉ.अंकिता धाकडे यांनी दंतरोगाबद्दल सविस्तर माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या वयोमानानुसार दातांची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले. अन्य मान्यवर पाहुण्यांचे सुद्धा यावेळी मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय भाषणात कवडूजी उंदीरवाडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन आपली संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सतत काम करत राहील असे आश्वासन दिले.
याप्रसंगी संस्थेचे वयोवृद्ध सभासद श्री राम राऊत यांचा शाल व गुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सभेच्या प्रारंभी संस्थेच्या जमाखर्चाचा हिशोब सादर करून त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली व संस्थेच्या पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. सभेमध्ये अनेक सभासदांनीसुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले व ही संस्था उत्तमरीत्या काम करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संपत गोडबोले, संचालन प्रल्हाद सहारे यांनी अहवालवाचन हंसराज उंदिरवाडे यांनी व आभार गोकुलदास गोवर्धन यांनी मानले. संस्थेचे पदाधीकारी दुर्वास टेंभूर्णे, मोतीराम कोटांगले, पुरूषोत्तम खेवले, रामचंद्र जांभूळकर यांनी कार्यक्रम यसश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.