– आमदार कृष्णा गजबे आणि डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश
The गडविश्व
मुंबई, २५ जुलै : अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी २६/०६/२०२३ रोजी संपुर्ण राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. सदर जाहिरातीत गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील १५१ व बिगर पेसा क्षेत्रात ७ पदे अशी एकूण १५८ पदांची भरती करण्यात येणार होती. १ फेब्रुवारी २०२३ व २८ फेब्रुवारी २०२३ ला सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आरक्षण व बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात आलेला नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजासह व्हिजे, एनटी एसबीसी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी अत्यल्प जागा असल्याने या सर्व प्रवर्गातील उमेदवारांवर मोठा अन्याय होत असल्याची या समाज घटकांची भावना होऊन त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक सर्व खासदार व आमदारांना निवेदन देत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने आमदार कृष्णा गजबे व डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदीय आयुधाचा उपयोग करून उपलब्ध कागद-पत्रांच्या आधारे गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी पदभरतीचे आरक्षण व बिंदुनामावली चुकीचे असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
त्याबाबत महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सुद्धा दिले. सदर मागणीची दखल घेऊन त्यांनी आपल्या दालनात बैठक घेतली असता शासनाने मागविलेल्या अहवालातुन गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी पदभरतीचे आरक्षण व बिंदुनामावली चुकीची असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने दिलेल्या आदेशानुसार २०/ ०७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी शुद्धीपत्रक काढुन सुधारीत पदभरती करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
तसेच तलाठी पदभरती अर्ज भरण्यासाठी २५/०७/२०२३ रोजी रात्री ११.५५ पर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार कृष्णा गजबे आणि डॉ देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश येवुन गडचिरोली जिल्ह्यात सुधारीत आरक्षण व बिंदुनामावली प्रमाणे तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.