The गडविश्व
ता. प्र / भामरागड, दि. ०३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच वन्यजीव सप्ताह निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगुडा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्या वतीने करण्यात आले.
सर्वप्रथम दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनकार्याची माहिती मुलांना देण्यात आली. त्यासोबतच शाळेतील काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापली भाषणे सादर केली. त्यानंतर संपूर्ण गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातील प्लास्टिक गोळा करून विद्यार्थ्यांनी त्याची योग्य विल्हेवाट लावली याशिवाय संपूर्ण गाव परिसर स्वच्छ केले. यानंतर शाळेमध्ये वन्यजीव सप्ताह निमित्त पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व यामध्ये उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय, विद्यार्थ्यांना लगेच पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेवजी हबका, प्रमुख पाहुणे डॉ.शरयू आंधळे लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा तसेच मुख्याध्यापक विनीत पद्मावार सहाय्यक, शिक्षक वसंत इष्टाम यासोबत गावकरी उपस्थित होते. शेवटी मुलांना खाऊ देऊन आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
