The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ फेब्रुवारी : तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कु. मेश्राम, सत्कारमूर्ती शासकिय माध्यमिक आश्रम शाळा, लाहोरा येथील मुख्याध्यापक नरेंद्र पुरी व प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निरंगशाह मडावी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी वर्ग पहिली ते दहावीचे विद्यार्थी, संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्याने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी कवी कुसुमाग्रज, सरस्वती व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि दीपप्रज्वलन केले.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांद्वारे तयार केलेल्या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठी राजभाषा दिवसानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये भाषण, कविता व श्लोक सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व तसेच आयुष्यामध्ये होणारे भाषेचे फायदे यावर व्याख्यान केले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतामध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनातील प्रकाश टाकला व मराठी राजभाषा दिवस का साजरा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन हर्षे यांनी केले तर आभार विद्यालयाच्या शिक्षिका पेदापल्ली मॅडम यांनी मानले.
(The Gadvishva) (Gadchiroli News) (Marathi Bhasha Din)