– मुख्य आरोपी अटकेत, चौघे फरार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्रीविरोधात गडचिरोली पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत आरमोरी तालुक्यातील डार्ली येथे सुरु असलेला अवैध कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत तब्बल ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी ओमप्रकाश शंकर गेडाम रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याला अटक केली आहे, तर इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. डार्ली येथील सौ. रेखाबाई सडमाके यांच्या घरात आरोपींनी ‘मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू’सह विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्यासाठी मशिन बसवून अवैध कारखाना सुरु केला होता. पोलिसांनी पंचासमक्ष घराची झडती घेतली असता शेकडो टिनाचे डबे, मोठ्या प्रमाणात कच्चा तंबाखू, पॅकिंग मशिन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बॅग क्लोजर मशीन, हुक्का शिशा पॅकिंगसाठी वापरलेले हेअर स्ट्रेटनर तसेच विविध पॅकिंग साहित्य मिळून आले. एकूण ३.३१ लाखांचा अवैध तंबाखू साठा आणि ४.५३ लाखांची मशिनरी व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२५ विविध कलमांखाली नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौड व पथकाने केली. पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #IllegalTobacco #PoliceAction #Gadchiroli #CrimeBranch #SeizedGoods #BanOnTobacco #MaharashtraPolice #Smuggling
#गडचिरोली #गुन्हेशाखा #तंबाखूबंधी #पोलीसकारवाई #अवैधकारखाना #मुद्देमालजप्त #महाराष्ट्रपोलीस #सुगंधिततंबाखू














