कुरखेडा : मौशी जंगलात तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०३ : तालुक्यातील मौशी गावाजवळील जंगलात रूपेश सहारे (४०) हा तरुण झाडाच्या फांदीला वेलीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश सहारे हा दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून कोणाला काहीच न सांगता निघून गेला होता. तो व्यसनी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, कुटुंबीयांनी तो मोहगांव येथील सांस्कृतिक कार्यक्रमाला गेला असावा असा समज करून त्याचा शोध घेतला नव्हता.
दरम्यान, काल गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याला झाडाच्या फांदीला वेल बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत सहारे दिसून आला. त्याने तातडीने गावकरी व कुटुंबीयांना माहिती दिली. तत्पश्चात कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठविण्यात आला. बुधवारी शवविच्छेदनानंतर पार्थिवावर मौशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मागे पत्नी, आई-वडील व दोन मुले असा परिवार असून घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














