कुरखेडा पं.स. ची आमसभा गाजली विविध मुद्द्यांवर

268

– विविध समस्येवर नागरिक आक्रमक
The गडविश्व
ता.प्र /कुरखेडा, ९ जून : तब्बल पाच वर्षानंतर झालेल्या पंचायत समिती कुरखेडा ची आमसभा विविध मुद्यांवर गाजली तर या आमसभेत नागरिकही आक्रमक झाले होते.
विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून स्थगित झालेली व कोरोना काळानंतर प्रथमच गुरुवार ८ जून रोजी कुरखेडा पं.स. ची आमसभा पार पडली. तब्बल पाच वर्षानंतर आमसभा असल्याने अनेक नागरिकांनीही हजेरी लावली होती. यावेळी तालुक्यातील कृषी, आरोग्य, पाणी व वीजपुरवठ्याची समस्या मांडत नागरिक आक्रमक झाले होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे हे या आमसभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार राजकुमार धनबाते, संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य बबलू हुसेनी, पं.स. माजी सदस्य चांगदेव फाये, माजी सभापती गिरीधर तितराम, श्रीराम दुगा, नगरसेवक उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, विलास गावडे आदी उपस्थित होते.
आमसभेत चारभट्टी येथे २०१८ पासूनच्या पाठपुराव्यानंतरही रुग्णवाहिका वाहन उपलब्ध होऊ शकली नाही, रामगड येथे पीएचसीची मागणी असतांना पुराडा येथे आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली नाही या मुद्यांवर जि.प.माजी सदस्य नंदू नारोटे व उपसरपंच मोहन पुराम यांनी आरोग्य अधिकारी डॉ मनीष रामटेके यांना तर कृषी कर्मचारी माहिती देत नाही याबाबत सरपंच संघटनेने तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांना जाब विचारला. तसेच सौरपाणीपुरवठा योजना, कृषीपंपाचे लोडशेडिंग, गावातील स्ट्रीट लाईट, रखडलेल्या कृषीपंप जोडण्या आदींबाबत उपअभियंता मिथुन मुरकुटे यांना विचारणा केली, उपजिल्हा रुग्णालयात मागील २५ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉ.संभाजी ठाकर व डॉ.भुणेश्वर खुणे यांच्याविषयी रोष व्यक्त करत विलास गावडे व नशीर हाशमी यांनी कारवाईची मागणी केली. तसेच आंधळीचे तलाठी कुकडे यांच्या कामाची चौकशी करण्याचीही मागणी यावेळी आमसभेत करण्यात आली. एकूणच या आमसभेत समस्येचा पाढाच वाचण्यात आला.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, kurkhwda aamsabha, mla krushna gajbe)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here