The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०३ : तालुक्यातील गेवर्धा व गुरनोली परीसरात मागील तिन दिवसांपासून नागरिकांना वयस्क वाघाचे दर्शन झाल्याने परीसरात दहशत पसरलेली आहे. शनिवार रोजी रात्री गेवर्धा – वडसा मार्गावर गुरनोली फाटा ते घाट यामध्ये मुख्य रस्त्यावर निघालेल्या वाघाची चित्रफीत समाज माध्यमावर वायरल झाली आहे. तसेच वाघ मका पिकात दडून असल्याची फोटो सूद्धा वायरल झाल्याने परीसरात दहशत निर्माण झाली आहे.
मागील तिन दिवसापासून हा वाघ परीसरात ठान मांडून असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे कुरखेडा-गेवर्धा-वडसा तसेच गुरनोली हा वर्दळीचा मार्ग आहे.तसेच अरततोंडी-महादेवगड येथे सूरू असलेल्या यात्रेत जाणाऱ्या भाविकांचे याच मार्गाने आवागमन सुरू असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ असते. तसेच परीसरात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू असल्याने त्यांना नियमित शेतावर जावे लागते. मात्र परीसरात वाघाचा उपस्थितीने दहशत पसरत त्याच्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनविभागाच्या वतीने परीसरातील गावात मुनारी देत एकट्याने जंगलात किंवा शेतात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांचा नेतृत्वात वनविभागाचे पथक परीसरात सतत गस्त करीत वाघाच्या हालचालीची माहिती व निगरानी करीत नागरिकांना माहीती देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करीत परीसरातून त्याला अन्य जगंलात हलवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
