-मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : मुलचेरा तालुक्यातील आदिवासीबहुल कोठारी येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीच्या समस्येवर मात करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला शक्तीने शर्तीचे प्रयत्न केले. दारूविक्रीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता ग्रामस्थांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याने मार्च २०२४ या महिन्यापासून हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे.
मुलचेरा पासून कोठारी हे गाव २८ किमी अंतरावर आहे. गावामध्ये आदिवासी जातीचे लोक वास्तव्य करीत असून लोकसंख्या ७०० आहे. गावामध्ये अजूनही आदिवासी परंपरा, जुन्या रितीरिवाजांचे पालन केले जाते. या गावामध्ये गोंडी भाषा बोलली जाते. पूर्वी या गावामध्ये अवैध दारूविक्री केली जात होती. अशातच मुक्तिपथ तालुका चमूने गावात भेटीगाठी वाढवून ग्रामस्थांना जागृत केले. त्यामुळे २०२१ मध्ये सलग सहा महिने अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, काही मुजोर विक्रेत्यांनी आपले डोके वर काढत दारूविक्रीचा अवैध व्यवसाय पुन्हा सुरु केला. ही समस्या लक्षात येताच मुक्तिपथ, गाव संघटना व गावातील महिलांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आपल्या गावात दारूबंदी पुनश्च लागू करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर २०२४ मध्ये होळीच्या सणाच्या पूर्वी गावातील लोकांची एक विशेष बैठक पार पडली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी दारूबंदीसाठी नागरिकांना जागृती करीत अवैध दारूविक्रीमुक्त गावातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. भांडण-तंट्यांमध्ये वाढ झाली आहे. शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान पटवून दिले. तसेच ग्रामस्थांनी एक होऊन दारूविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी दारूबंदीचा निर्णय घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गाव संघटना पुर्नगठीत व मजबूत करण्यात आली. त्यानंतर विविध उपाययोजना करून ग्रामस्थांनी अवैध दारूला आपल्या गावातून हद्दपार केले. आता मार्च महिन्यापासून गावात दारूबंदी असल्याने लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. दारूमुळे होणाऱ्या भांडण-तंट्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महिलांना होणारा त्रास देखील कमी झाला असून आपल्या गावाला दारूबंदीमुळे फायदा झाला असल्याचे मत ग्रामस्थांतून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या वतीने कार्य सुरु आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )