डेंग्यू नियंत्रणासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा

163

– जिल्हा हिवताप अधिकारी यांचे आवाहन
The  गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यापासून होतो. हा डास काळ्या रंगाचा असून त्या डासांच्या पायावरती पांढऱ्या रंगाचे टिपके असतात. हा डास दिवसा मनुष्यास चावतो. या डासाची उत्पत्ती ही घरातील स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात काही भागात अतिपाऊस, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकास कामे अशा अनेक कारणामुळे डेंग्यू आजाराचे प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत.
डेंग्यू आजाराची लक्षणे – एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, नाकातोंडातून हिरडयातून रक्त स्त्राव होणे, रक्त मिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. हि लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्यावे.
डेंग्यू आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना – घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करावीत, एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे जेणेकरून डास त्या भांड्यामध्ये अंडी घालण्यासाठी प्रवेश करू शकणार नाही, डेंग्यू डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावी. डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावी, घरातील टाक्या, हौद कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत. अंगभर कपडे घालावेत. झोपतांना मच्छरदाणीचा तसेच डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. डेंग्यू या आजाराच्या निश्चित निदानासाठी फक्त इलायझा टेस्ट शासनमान्य असून जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेंटीनल कार्यान्वित केलेले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी डेंग्यू संशयित रुग्णांचे नमूने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यू आजाराची लक्षणे जाणवताच नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार करून घ्यावे असे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here