संविधानाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य

189

– देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर.भडके यांचे प्रतिपादन
The गडविश्व
देसाईगंज, (Desaiganj) २ डिसेंबर : माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. संविधानाच्या बळावर समाजात सामाजिक, आर्थिक, न्यायीक मुल्ये रुजवून समता, बंधुता प्रस्थापित करता येणे शक्य आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी हे सर्वतोपरी असल्याने संविधानाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असले पाहिजे असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर.भडके यांनी केले.
ते देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात देसाईगंज तालुका विधी सेवा समिती तथा अधिवक्ता संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून आयोजीत कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य थुल, जेष्ठ अधिवक्ता ॲड.संजय गुरु, ॲड.दत्तु पिलारे, डाॅ.बाळबुद्धे, डाॅ.आरती झामके, डि.एन.टेंभुर्णे, सुरेश रामटेके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलताना न्यायाधिश भडके म्हणाले की समाजात नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी नैतिक मुल्ये जोपासने गरजेचे आहे.देशात वेगवेगळे प्रांत, भाषा असले तरी सर्वांना मानवतेच्या चौकटीत बसविण्याचे काम संविधानामुळेच शक्य असल्याने प्रत्येकाने संविधानाचे केवळ वाचनच करणे नव्हे तर त्यावर आधारित समाज व्यवस्था कशी निर्माण करता येईल, याबाबत विचार केल्यास याचा समाजाला, पर्यायाने देशाला नैतिकतेच्या दिशेने नेण्यात फार मोठा आधार होऊ शकतो, यास्तव संविधान समजुन घेणेही तेवढेच गरजेचे असल्याचे सांगितले.
तथापी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना जेष्ठ अधिवक्ता ॲड. संजय गुरु म्हणाले की संविधानाने सर्वांचे अधिकार अबाधित राखले आहे. संविधान हे सर्व कायद्याचा आत्मा असुन विखुरलेल्या समाजाला एका प्रवाहात आणुन समानतेची वागणूक प्राप्त करून देत असल्याने त्याचे प्रतेकाने जतन करणे काळाची गरज आहे. वास्तविक जीवन जगताना संविधानाचे अनन्य साधारण महत्व असल्याने प्रत्येकाने त्याचे जतन केले तरच नैतिक मुल्यावर आधारीत समाज व्यवस्थेची कल्पना शक्य आहे.यास्तव त्याचे संवर्धन काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डि.एस.भागडकर, प्रास्ताविक व आभार डाॅ.शोभा भुरभुरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Desaiganj) (Gadchiroli News updates) (judge A.R.Bhadke)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here