खेडी येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

80

– माजी खा.अशोक नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १५ : आदर्श क्रीडा मंडळ खेडी (रांगी) तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा आणि सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम १३ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी मा.खा.अशोक नेते यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण फीत कापून आणि सभागृहाचे पूजन करून सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा.खा.अशोक नेते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या सभागृहाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी व्हावा. सुंदर आणि भव्य स्वरूपाचे हे सभागृह खेडी गावाला नवीन ओळख देईल. स्थानिक नागरिकांनी याचा योग्य वापर करून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. यासोबतच भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला खेळाडूंना मार्गदर्शन करत “कोणत्याही स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम मानावा, यामुळे वादविवाद व गैरसमज टाळता येतात,” असे त्यांनी सांगितले. तसेच, सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या वेळी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे व मा.खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी हे पुढे बोलताना खेडी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पाण्याच्या प्रश्नासह इतर गरजांवर लक्ष केंद्रीत करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून वातावरण अधिक रंगतदार केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गोंड समाज संघटनेचे अध्यक्ष लालाजी उसेंडी, कृ. उ. बा. स. चे सभापती शशिकांत साळवे, सरपंच मंगला बोगा, जीवनदास उसेंडी, सारंग साळवे, नरेंद्र भुरसे, साजन गुंडावार, संजय कुंडू, अनुसया कोरेटी, ममता हीचामी यांसह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमांनी खेडी (रांगी) गावाच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला नवा उभारी मिळवून दिली. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here