गडचिरोलीत : अवैध देशी दारूसह स्कॉर्पिओ जप्त, 73 लाखांचा मुद्देमाल ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैधवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथे धाड टाकून 730 पेट्या देशी दारूसह महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले. एकूण 73 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता, घटनास्थळी स्कॉर्पिओ वाहनात मोठ्या प्रमाणावर देशी दारु लपवून ठेवलेली आढळली. या प्रकरणी मिथुन विश्वास मडावी (वय 35, रा. आलापल्ली) यास पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन आरोपी कारवाईदरम्यान पसार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालात 58 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 730 पेट्या देशी दारु व 15 लाख रुपये किंमतीचे स्कॉर्पिओ वाहन (क्र. MH 34 CD 8410) असा एकूण 73 लाख 40 हजार रुपयांचा समावेश आहे.
या घटनेवरून अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कलम 65(अ), 65(ई), 83, 98(2) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या देखरेखीखाली पार पडली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. राजु पंचफुलीवार व चापोअं. दिपक लोणारे यांनी सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














