गडचिरोली जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी मिळतो आरोग्यासाठी उत्तम असलेला हातसडीचा तांदूळ

1208

– “पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम”
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा , ४ जून : कुठलीही प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ. यातून आपल्याला प्रथिने, लोह आणि फायबर मिळतात. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी असल्याचे समोर येत असल्याने या तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील ओमकार महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत हा नावीन्यपूर्ण प्रकल्प उभा केला असून यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे.
कोरोना काळापूर्वी मोठ्या प्रमाणात मशरूमचा उत्पादन करून रोजगार मिळवणाऱ्या या बचत गटाला कोरोनामुळे खूप नुकसान झाले. तालुक्यातील एक मात्र मशरूम उत्पादन असलेल्या या बचत गटांनी स्वतःची वितरण व्यवस्था ही निर्माण केली होती. परंतु संपूर्ण देशात कोरोनामुळे आलेल्या विपदेने यांच्या या कामालाही पूर्णविराम लावून गेला.
धगधगतीच्या जीवनात शरीराला आवश्यक असलेल्या पोषण तत्त्वांची गरज असते अशात हातसळीच्या तांदळाचा उपयोग यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाऊ शकतो अशी संकल्पना सुचल्याने त्यांनी हा प्रयोग सुरू केला असून त्यांच्या उत्पादनाला बऱ्यापैकी मागणी येऊ लागलेली आहे.
हातसडीच्या तांदळावरचा कोंडा काढला जात नाही. त्यामुळे त्यांच्यातील व्हिटॅमिन्स आणि खनिज टिकून राहतात. हे दोन्ही प्रकारचे तांदूळ ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यातून दोघात फरक निर्माण होतो. पांढऱ्या तांदळाचा कोंडा काढून तो साफ केला जातो. त्यानंतर अनेक प्रक्रियांमधून जाऊन तो बाजारात पोहोचतो. या प्रक्रियेत तांदूळ चकाकतो. पण, पोषक तत्वे कमी होत जातात. यामुळे हातसडीच्या तांदळाला अधिक मागणी वाढत आहे.
हल्ली यंत्राच्या साह्याने भाताच्या दाण्यांवरील साल / टरफल काढून त्याला पॉलिश केले जाते. यामुळे तांदूळ व साल यांच्या मध्यात असलेले प्रथिने, लोह व फायबर, क जीवनसत्त्व यांच्यासह अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. पण तांदळाला मात्र चांगलीच शुभ्रता येते. या तांदळाची किंमतही हातसडीच्या तांदळापेक्षा कमी असते. यामुळे सर्वसामान्य माणूस पांढऱ्या तांदळाचा अधिक प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसून येते. असे असले तरी यंत्र साडीच्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

४० पासून १०० रुपयांपर्यंत

हातसडीचा तांदूळ यंत्रसडीच्या तांदळाच्या तुलनेत किमतीने थोडा महाग असतो. याचे कारणही तसेच आहे. यातील पौष्टिक तत्वे कायम राहतात व ती आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. यामुळे या तांदळाची किंमत अधिक असते.

कोणत्या तांदळाला अधिक मागणी असते

जिल्ह्यात साधारणतः पांढऱ्या तांदळाला अधिक मागणी असते. पांढरा तांदूळ किमतीला कमी असल्याने सर्वसाधारण लोकांच्या आवाक्यात असतो. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारे लोक अधिक प्रमाणात असतात. भलेही यात पौष्टिक तत्वे कमी असतात. पण किमतीने परवडत असल्याने याची मागणी अधिक आहे.

प्रक्रिया केल्याने प्रथिने, लोह, फायबर जाते निघून..

तांदळाच्या कोंड्यात व्हिटॅमिन बी ६ असते. पॉलीश केलेल्या तांदळात ते राहात नाही. तांदळावर यंत्राद्वारे बऱ्याच प्रक्रिया केल्याने टरफल व दाण्यांवरील असलेली पौष्टिक तत्वे नष्ट होतात.

गुरनोली येथील या महिला बचत गटांच्या प्रकल्पाला शासकीय स्तरावरून प्रोत्साहन व आर्थिक मदत उपलब्ध झाल्यास त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्याला घरपोच हातसडीचा तांदूळ पाहिजे असल्यास ओमकार महिला बचत गटाच्या अध्यक्ष वृंदाताई खुणे यांच्या मोबाईल क्रमांक 7588995736 वर संपर्क करून ऑर्डर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here