सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : तहसीलदार माळी यांचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर 2025) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत राज्यभर “सेवा पंधरवाडा” कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. धानोरा तालुक्यात या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी 16 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पहिला टप्पा : पाणंद रस्ते मोहिम (17 ते 22 सप्टेंबर 2025) या कालावधीत महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार (दि. 29 ऑगस्ट 2025) पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, नोंदीकरण, शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र गोळा करणे, तसेच रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे अपेक्षित आहे.
दुसरा टप्पा : “सर्वांसाठी घरे” पूरक उपक्रम (23 ते 27 सप्टेंबर 2025) सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जमिनीचे पट्टे वाटप, रहिवासी प्रयोजनासाठी जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करणे, तसेच विकास आराखड्याशी सुसंगत जमिनीवरील गायरान नोंदी कमी करण्याची कार्यवाही होणार आहे. खाजगी व शासकीय मिळकतधारकांना घरकुलासाठी पट्टे वाटप करणे हाही या टप्प्याचा भाग असेल.
तिसरा टप्पा : नाविन्यपूर्ण उपक्रम (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीचा विचार करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहेत. यात विद्यार्थ्यांना दाखले वाटप, लक्ष्मीमुक्ती योजनेतून पत्नीचे नाव पतिसह लावणे, तसेच MLRC 1966 कलम 85 नुसार विभाजन अर्ज निकाली काढणे यांचा समावेश असेल.
तहसीलदार गणेश माळी यांनी सर्व तालुकावासीयांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन सेवा पंधरवाडा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













