धानोरा येथे अवैध जनावरांची वाहतूक उघड : दोन वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०७ : धानोरा पोलिसांनी गोडलवाही-धानोरा मार्गावर धडक कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे दोन वाहन जप्त केली. या कारवाईत तब्बल ३५ जनावरे (२० गायी व १३ बैल जिवंत, तर २ मृत) ताब्यात घेण्यात आली असून सुमारे ३० लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोडलवाहीकडून धानोऱ्याकडे पांढऱ्या रंगाच्या सहाचाकी ट्रक (क्र. MH-40 CT-7892) व पायलेटिंग वाहन (क्र. MH-30 AT-2517) येणार असल्याचे समजले. त्यानुसार गोडलवाही फाट्यावर सापळा रचून वाहनांना थांबविण्यात आले. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ३५ जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने कोंबून अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
धानोरा पोलिसांनी तातडीने वाहने पोलिस स्टेशनला आणून कायदेशीर कारवाई केली. दोन मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांना दफन करण्यात आले, तर उर्वरित ३३ जिवंत जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरडे यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जंगले व त्यांच्या पथकाने केली. यात पोहेका भजनराव गावडे, जन्हेरसिंग उसेंडी, नापोका गितेश्वर बोरकुटे, पोशी प्रविण राऊत, मंगेश राऊत, गोरखनाथ चव्हाण, प्रविण गोडे यांचा सहभाग होता.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews














