गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी ; प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया

18

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी ; प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली,दि. १२ : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. जिल्हा रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली असून, दुर्गम आणि आदिवासी भागातील रुग्णांसाठी आधुनिक उपचारांची नवी आशा निर्माण झाली आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणारी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः अस्थिव्यंगाच्या गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच ऑपरेशन थिएटरमधील सुश्रुषा कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
या यशाबद्दल बोलताना डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ही यशस्वी शस्त्रक्रिया संपूर्ण वैद्यकीय टीमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फलित आहे.”
तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करत, भविष्यात अशा अनेक आधुनिक शस्त्रक्रिया नियमितपणे जिल्हा रुग्णालयात राबवल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.
या ऐतिहासिक यशानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गडचिरोलीच्या आरोग्य सेवेसाठी हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here