गडचिरोली : वेतनवाढीच्या आमिषाने दोन वर्षे लैंगिक छळ, कंत्राटी आरोग्य सेविकेचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

79

गडचिरोली : वेतनवाढीच्या आमिषाने दोन वर्षे लैंगिक छळ, कंत्राटी आरोग्य सेविकेचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
– तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर Zero FIR दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : मुलचेरा येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी महिला आरोग्य सेविकेने सतत सुरू असलेल्या मानसिक छळ आणि लैंगिक मागण्यांना कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ६ डिसेंबर २०२५ रोजी राहत्या घरी विष घेतल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय ५०) यांनी या कंत्राटी सेविकेला वेतनवाढीचे आमिष दाखवत मागील दोन वर्षांपासून वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली होती. या अमानुष वागणुकीमुळे पीडितेवर गंभीर मानसिक ताण आला होता. याच त्रासातून जिवावरचा खेळ करत तिने विषप्राशन केले, असा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित सेविकेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी Zero FIR दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहिता कलम ७५(२) व ७८(२) अन्वये आरोपी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास मुलचेरा पोलिसांकडून सुरू असून, आरोग्य विभागात निर्माण झालेल्या या प्रकारामुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे. आरोपी अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Mulchera #HealthWorker #ContractStaff #SexualHarassment #WagePromise #SuicideAttempt #PoisonConsumption #ZeroFIR #IndianPenalCode #PoliceInvestigation #MedicalOfficer #BreakingNews #LocalNews #GadchiroliNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here