गडचिरोली पोलीसांनी नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला जहाल नक्षली बिटलूचे स्मारक केले उध्वस्त

2455

The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : नक्षलवादी संघटनेकडुन दरवर्षी २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या दरम्यान नक्षल शहिद सप्ताह पाळण्यात येतो. दरम्यान नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला २७ जुलै २०२३ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोमके ताडगाव हद्दीतील मौजा विसामुंडी या गावाजवळ जहाल नक्षल संजू ऊर्फ बिटलू तीरसू मडावी याचे नक्षलवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलीस विशेष अभियान पथक व क्युआरटी भामरागडच्या जवानांनी उध्वस्त केल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी आज दिली.
पोलीसांनी सांगितले की, नक्षली या सप्ताह दरम्यान देशविघातक कृत्य करणे, पोलीस दल तसेच सशस्त्र दलाच्या जवानांना नुकसान पोहचविणे, मृत नक्षली यांचे स्मारके उभारणे, जनतेमध्ये भितीदायक वातावरण निर्माण करणे इ. प्रकारच्या देशविरोधी व समाजविरोधी कारवाया केल्या जातात.
स्मारक उध्वस्त करण्यात आलेल्या जहाल नक्षली बिटलू याच्यावर खुन, चकमक व जाळपोळीचे एकुण १५ गंभीर गुन्हे दाखल होते. ज्यामध्ये ७ खुन, २ चकमक, ४ जाळपोळ व २ दरोडा यांचा समावेश होता. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा निष्पाप आदिवासी होतकरु विद्यार्थी साईनाथ नरोटे याच्या हत्येमध्ये बिटलू याचा प्रत्यक्ष सहभाग होता, बिटलू सारखे क्रूर हत्यारे फक्त खबरी असल्याच्या संशयावरुन अनेक निष्पापांची क्रूर हत्या करतात. अशा सारख्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही. अशा हत्यायांचे स्मारक उभारणे म्हणजे समाजविरोधी कृत्य आहे. त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करु नये.
या भागात आपल्या कुकृत्यासाठी प्रसिद्ध असलेला बिटलू नेहमीच आदिवासी बांधवांना दहशतीत ठेवायचा. देशविरोधी, संविधानविरोधी कारवाया करायचा विकास कामांना विरोध करायचा आणि या देशद्रोही बिटलूचे स्मारक नक्षल्यांकडून उभारले जाते पण गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी त्याचे स्मारक उध्वस्त करुन त्या भागातील जनतेला एक विश्वास दिला आहे की, अशा नराधमांच्या दहशतीला आता झुगारुन द्या, तुम्ही स्वतंत्र आहात. नक्षलवाद्यांचा सप्ताह पाळण्याची आणि त्यांना घाबरण्याची आता गरज नाही. कारण गडचिरोली पोलीस दल तुमच्या संरक्षणासाठी व विकासासाठी सदैव तत्पर आहे असेही पोलिसांनी सांगितले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक यांनी नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून, नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, naxal saptah, naxal week)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here