– दुर्गम-अतिदुर्गम भागातील ८० विद्यार्थी पावसाळी शिबीराकरीता रवाना.
The गडविश्व
गडचिरोली, १२ सप्टेंबर : जिल्हा पोलीस दलाच्य वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ‘पोलीस दादालोरा खिडकीचे’ माध्यमातुन गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज १२ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उत्थान अंतर्गत “स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन” पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.
याप्रसंगी संदिप पाटील सा. पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपुर यांनी संवाद साधतांना उपस्थित शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायात उतरण्याचे आवहान केले तसेच गडचिरोली जिल्हयातील महिलांनी कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त योगदान द्यावे व आपली आर्थीक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे. तसेच माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाला सहकार्य करुन जिल्ह्राचा विकास करावा असे सांगितले.
सदर स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळाव्यामध्ये दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध ठिकाणाहुन ४०० पेक्षा अधिक महिला, पुरुष शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये भाजीपाला लागवड प्रशिक्षणात १०० महिला, लोणचे पापड प्रशिक्षणात ३५ महिला, मधुमक्षीका पालन प्रशिक्षणात १५, शेळी पालन प्रशिक्षण २४ कुक्कुटपालन प्रशिक्षणात ३४, मत्स्य पालन प्रशिक्षणात ३५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. उपस्थित प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना २० किटकनाशक फवारणी पंप, ३५ लाभार्थ्यांना लोणचे पापड किट, ७० बॅग मत्स्य बिज, ०५ फास्ट फुड किट व १५ मधुमक्षीका किट इ. चे वाटप करण्यात आले. तसेच गडचिरोली पोलीस दलाकडुन आयोजित करण्यात आलेले भरती पूर्व प्रशिक्षण घेतलेल्या ११० विद्यार्थांचे विविध ठिकाणी निवड झाली आहे, त्यापैकी ०४ विद्यार्थांचे MSF मध्ये निवड झाली त्या विद्यार्थांचा मान्यवंराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच MS-CIT चे प्रशिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात आले.
त्यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या कृषी सहलीमध्ये नागपूर, अकोला, शेगाव, जळगाव, अमरावती, अजिंठा, राहुरी, नारायणपुर, देवगड, बडनेरा, वर्धा, वरोरा, भद्रावती जि. चंद्रपूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अकोला व राहुरी येथील कृषी विद्यापीठांना भेट देण्यात आली आहे. भेटीदरम्यान शेतकयांना शेतीचे वेगवेगळे तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले आहे. तसेच सहलीतुन परतल्यानंतर कृषीवीरांसोबत संदिप पाटील सा. पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपुर यांनी संवाद साधला. सहलीत गेलेल्या कृषीवीरांनी यांनी त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणाबद्दलच्या अत्याधुनिक शेती व उपकरणांबाबतची पाहणी केली व त्याचा आपल्या पारंपारिक शेतीमध्ये योग्य प्रकारे वापर करणार असे मनोगत व्यक्त केले.तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
त्यासोबत गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत १२ ते १६ सप्टेंबर या कालावधी करीता गडचिरोली जिल्हयातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील ८० विद्यार्थी पावसाळी शिबीरा करीता रवाना करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपुर संदिप पाटील सा., पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा., प्रफुल पोरेड्डीवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अमोल सोनोने, मत्सव्यवसाय विकास अधिकारी गडचिरोली, सुधाकर गौरकर सहायक प्रकल्प अधिकारी गडचिरोली, हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व प्रभारी अधिकारी पोलीस कल्याण शाखा नरेन्द्र पिवाळ आणि सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.