गडचिरोली : जखमी, आजारी जनावरांच्या उपचाराकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

634

– पशुमित्रांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीकडे केली तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, ४ सप्टेंबर : जिल्हा मुख्यालयात अपघात होऊन मोकाट व रस्त्यावर बसणारी जनावरे जखमी होण्याचे प्रमाण वाढले असून अशा जनावरांवर उपचार करण्याकडे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने याबाबतची तक्रार येथील पशुमित्रांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीकडे आज निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गावरून तसेच अंतर्गत मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे अपघात होऊन मोकाट व रस्त्यावर बसणारी जनावरे जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तसेच बेवारस व आजारी जनावरेसुद्धा आढळून येतात. परंतु अशा जनावरांवर उपचार करण्याकडे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जखमी, आजारी जनावरे आढळून आल्यावर पशु मित्र पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. बाहेर आहे, सुट्टीवर आहे अशी उत्तरे दिली जातात. काही अधिकारी तर चक्क मोबाईल बंद करून ठेऊन देतात. शनिवार आणि रविवार या दिवशी तर अजिबात अधिकारी उपचार करण्यासाठी येत नाहीत. यामुळे मुक्या जनावरांवर उपचार करणार कोण ? जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय असूनही पशुवैद्यकीय अधिकारी मुजोरीने वागत असतील तर जिल्ह्यातील दुर्गम भागातील परिस्थिती काय असणार याचा विचार न केलेलाच बरा. आशा परिस्थिती मुळे पशु मित्रांना त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले असता साधा कापूस व औषध सुद्धा बाहेरून घेण्यास सांगितले जाते. यामुळे पशु मित्र आपल्या खिशातून पैसे लावून जनावरांवर उपचार करून घेत आहेत. औषध उपलब्ध करूनही पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिसादच देत नसतील तर उपचार करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार संपर्क करून परिस्थिती निदर्शनास आणून देत असतांनाही पशुवैद्यकीय अधिकारी असेच दुर्लक्ष करीत राहील्यास आम्ही सर्व पशुमित्र तीव्र आंदोलन करू, याकरिता केवळ पशुसंवर्धन विभाग जबाबदार राहील याची नोंद असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना बटेश्वर माहदेव गोशाळा गडचिरोली चे प्रफुल बिजवे, प्राणी मित्र अजय कुकडकर, नितेश खडसे, अनिल बालेकरमकर, मुरारी तिवारी, मृणाल राऊत, वैभव बोबाटे, योगेश हजारे, पंकज फरकडे, प्रदीप सोनटक्के, गुणवंत बाबनवाडे, मनोज पीपरे, मकसुद सय्यद, अनुप म्हाशाखेत्री, आकाश कोडाप, नितेश टेंभुरने, अविनाश बांबोळे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here