The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र येमाली बुर्गी अंतर्गत येत असलेल्या गुंडापुरी येथील शेतशिवारत दहा वर्षीय चिमुकली नातीनसह तिघांची हत्या केल्याची घटना ०७ डिसेंबर रोजी दुपारच्या उघडकीस आली आहे. सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. देउ दसरू कुमोटी ( वय ६०), बिच्छे देउ कुमोटी (वय ५५), नातीन अर्चना रमेश तलांडी (वय १०) असे मृतकांची नावे आहेत.
पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही भात काढणीच्या कामासाठी त्यांच्या शेतात राहत होते. दरम्यान त्यांची कठोर आणि बोथट वस्तूने शेतातच हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्र येमाली बुर्गी येथील पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविले. तर सदर हत्येत माओवाद्यांचा कोणताही सहभाग समोर आलेला नसून हत्येचे कारण नातेवाईकांमधील वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचेही पोलिसांद्वारे मिळालेल्या प्राथमिक माहितीतून कळते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे. सदर घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.