गडचिरोली : कडेकोट बंदोबस्तात होणार मतमोजणी, निवडणूक यंत्रणा सज्ज

996

– मतमोजणीच्या आरमोरीत २३ फेऱ्‍या, गडचिरोतील २६ फेऱ्या आणि अहेरीत २२ फेऱ्या होणार
– निवडणूक निरीक्षकांकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२२ : उद्या २३ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी मतमोजणीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्राच्या सभोवताली सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. यात १०० मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहेत.
विधानसभा मतदारसंघाची निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ६७- आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड, वडसा येथे, ६८-गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे तर ६९-अहेरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली ता. अहेरी येथे होणार आहे. मतमोजणी व्यवस्थेचा आढावा संबंधीत निवडणूक निरीक्षक यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरीता टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, स्ट्राँगरूम, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

मतमोजणीचे टेबल व एकूण फेऱ्या व मनुष्यबळ 

६७-आरमोरी मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २३ फेऱ्या, ९ टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८८ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
६८-गडचिरोली मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २६ फेऱ्या, १० टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८० मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
६९-अहेरी मतदार संघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २२ फेऱ्या, ९ टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीचे टेबल व ईटीपीबीएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८९ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध

मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईल/लॅपटॉपचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच केवळ मिडीया कक्षात प्रवेश राहील.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #election2024 #maharashtrelection #vidhansabhaelection #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroli #गडचिरोली #विधानसभा_निवडणूक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here