गडचिरोली : ११ वरिष्ठ नक्षलवाद्यांचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण
– दोन डिव्हीसीएमसह ११ जहाल माओवाद्यांचा समावेश, ८२ लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : महाराष्ट्र पोलीस दलाच्या माओवादविरोधी अभियानाला आज मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासमोर आज (१०) एकूण ११ वरिष्ठ नक्षलवाद्यांनी (माओवाद्यांनी) त्यांच्या शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे तब्बल ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ०२ डिव्हीसीएम, ०३ पीपीसीएम, ०२ एसीएम आणि ०४ सदस्य दर्जाच्या माओवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापैकी ०४ जहाल माओवाद्यांनी नक्षलवादी गणवेशात आणि त्यांच्याकडील शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला आणि अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान हा महत्त्वाचा आत्मसमर्पण सोहळा पार पडला. गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफचे एकत्रित प्रयत्न यशस्वी होत असून, शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे सन २०२५ मध्ये आतापर्यंत (आजच्या ११ माओवाद्यांसह) एकूण ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ज्यामुळे गडचिरोली पोलीस दलासमोर आतापर्यंत एकूण ७८३ माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.
आज आत्मसमर्पण केलेल्या ११ जहाल माओवाद्यांमध्ये रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (वय ५७) (डिव्हीसीएम, १६ लाख बक्षीस) आणि भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी (वय ४६) (डिव्हीसीएम, १६ लाख बक्षीस) या दोन वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यासह पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा ( वय ४१) (पीपीसीएम ०८ लाख बक्षीस), रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम (वय ३२) (पीपीसीएम ८ लाख बक्षीस), कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (वय ३०) (पीपीसीएम ८ लाख बक्षीस), पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (वय ३६) (एसीएम ६ लाख बक्षीस), रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी (वय ३५) (एसीएम ६ लाख बक्षीस), सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो (वय २१) (सदस्य ४ लाख बक्षीस), प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी (वय २२) (सदस्य ४ लाख बक्षीस), सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो (वय २२) (सदस्य ४ लाख बक्षीस) आणि साईनाथ शंकर मडे (वय २३) (सदस्य २, लाख बक्षीस) या माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. या सर्वांना आता केंद्र व राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार रोख रक्कम आणि इतर मदत मिळणार आहे.
या आत्मसमर्पणानंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. याच वर्षात महत्त्वाचे नक्षलवादी नेते ताराक्का सिडाम (०१ जानेवारी) आणि पोलीत ब्युरो सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू (१५ ऑक्टोबर) यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोलीसह संपूर्ण दंडकारण्य विभागातील नक्षलवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली आहे.
पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात नक्षलवादविरोधी कारवाईत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी-६० (C-60) अधिकारी व जवानांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डीजीपी शुक्ला यांनी उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे कळकळीचे आवाहन केले. यासोबतच, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalsurrender #gadchiroli














