The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : धानोरा तालुक्यातील सिंदेसुर येथील महिलेला बांबूच्या काठीने मारहाण करून अत्याचार करणाऱ्या पाच आरोपींना धानोरा येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश श्रीमती एन. ए. पठाण यांनी दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास, साधा कारावास व एकूण ७५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी लिलाबाई बिसाऊ गोटा, सोबराज अलीयारसिंग मडावी, कोलीबाई सोबराज मडावी, लालतीबाई धनीराम गावडे आणि रगोतीबाई सोबराज मडावी असे आरोपींची नावे आहेत.
१२ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पीडित महिलेला आरोपींनी इलेक्ट्रिक पोलला बांधून तिच्या अंगावरील वस्त्रे फाडून बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली होती. या संदर्भात फिर्यादी सौ. दुलोबाई फत्तेसिंग धुर्वा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान तपास अधिकारी मपोउपनि. अंजली मेवासिंग राजपूत यांनी आरोपींना अटक करून गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. प्राप्त सबळ पुराव्यावर आधारित दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला धानोरा न्यायालयात चालविण्यात आला. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे मान्य केले.
पाचही आरोपींना न्यायालयाने कलम ३५४, ३५४ (ब), ३४१, ३२४, ३४ भादंवी अंतर्गत दोषी ठरवले. एक वर्ष सश्रम कारावास, एक वर्ष साधा कारावास व दोन महिने साधा कारावास अशा शिक्षेसह प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड, एकूण ७५ हजार रुपयांची शिक्षा पाचही आरोपींना सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींनी शिक्षा एकाचवेळी भोगायची असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील बी. के. खोब्राागडे यांनी युक्तिवाद केला. तर तपास अधिकारी अंजली मेवासिंग राजपूत (पोस्टे धानोरा) यांनी तपास पूर्ण केला. तसेच खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी श्रेणी पोउपनि. सलामे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Justice #Gadchiroli #CourtVerdict #Crime














