The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलाने राबविलेल्या माओवादविरोधी मोहिमेत झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला नक्षली ठार झाल्या आहेत. यामध्ये गट्टा दलम कमांडर व एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी महिलांचा समावेश असून, त्यांच्या नावावर एकूण १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. घटनास्थळावरून एके-४७ रायफल, पिस्तूल, ३७ जिवंत काडतुसे, वॉकी-टॉकी यांसह मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या पथकांनी तसेच सीआरपीएफ 191 बटा. ई कंपनीच्या पथकाकडून जंगलाच्या बाहेरुन सदर जंगल परिसरात घेराबंदी करण्यात आली ल. यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले मात्र नक्षलींनी हल्ला अधिक तीव्र केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत दबाव आणला. त्यात दोन महिला नक्षली ठार झाल्या.
सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी (३८), रा. मडवेली, ता. अहेरी, जि. गडचिरोली – गट्टा दलम कमांडर. तिच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. १४ चकमकी, १२ खून, ३ जाळपोळ व इतर गुन्ह्यांसह एकूण ३१ गुन्ह्यात ती सामील होती.
ललिता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा (३४), रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.) – गट्टा दलम एसीएम. तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. ८ चकमकी, ४ खून, १ जाळपोळ व १ इतर गुन्ह्यात सहभाग नोंदविला गेला असून एकूण १४ गुन्ह्यांत ती सामील होती. ही डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती.
या संपूर्ण कारवाईत सी-६० व सीआरपीएफ जवानांनी दाखविलेल्या शौर्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले असून, गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच सर्व माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #naxalencounter#Gadchiroli #NaxalEncounter #MaoistInsurgency #CRPF #C60Commandos #PoliceOperation #WomenMaoists #RewardedMaoists #AntiNaxalOperation #SecurityForces #IndiaSecurity #MaoistViolence #ChhattisgarhBorder #EncounterNews #BreakingNews














