गडचिरोली शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची मागणी

39

– पोलीस अधीक्षकांकडून १५ दिवसांत बदलांचे आश्वासन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ठोस पावले उचलली असून वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे आणि आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात शहरातील गांधी चौकातील गोल सौंदर्यीकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिग्नल स्पष्ट न दिसल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. त्यामुळे सदर सौंदर्यीकरण तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गांधी चौकातील सिग्नल वारंवार तांत्रिक बिघाडामुळे बंद असतो. त्या वेळी वाहतूक शिपायांनी नियंत्रण करणे आवश्यक असतानाही, ते चालान देण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे चौकांमध्ये किमान चार वाहतूक शिपाई नव्याने नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेषतः जिल्हा न्यायालय चौक, आयटीआय चौक, कारगिल चौक व शिवाजी महाविद्यालय चौक येथे प्रति चौक दोन शिपायांची नियुक्ती करण्याचा आग्रह धरला आहे.
याशिवाय, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांकडून होणाऱ्या दंड वसुलीप्रमाणेच अवजड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, रेती व मुरुमाची तस्करी करणारे ट्रक-ट्रॅक्टर यांच्यावरही नियमित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शहराच्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मूरखळा-सेमाना माडेतुकूम-अडपल्ली असा बायपास / रिंगरोड विकसित करण्यासंदर्भात तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, अशी सूचना देखील शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. यासोबतच डीपी प्लाननुसार शहरात सर्व्हिस रोड विकसित करण्याबाबतही नगरपरिषदेला सूचना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी, “शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आमूलाग्र बदल करण्यात येतील,” असे स्पष्ट आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकारामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here