निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत शिक्षणाधिकारी काटोलकर यांची होणार चौकशी

502

– शिक्षकांची दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार अडबाले यांनी केली होती तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, २४ जून : ऑनलाइन वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत पात्र शिक्षकांची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. याप्रकरणी नागपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर यांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता पात्र शिक्षकांचे नाव नोंदणी करण्याबाबत कार्यक्रम २६ मे २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, शासन निर्णय निर्गमित व्‍हायच्‍या आधीच नागपूर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर यांनी १९ मे रोजी शिक्षकांच्या नाव नोंदणीकरिता पत्र निर्गमित केले होते. काटोलकर यांच्या पत्रामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची दिशाभूल केली, असे पत्र २९ मे रोजी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दिले होते.
आमदार अडबाले यांच्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी काटोलकर यांची चौकशी करण्याचे आदेश २२ जून रोजी शिक्षण विभागाने काढले आहेत. राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार ही चौकशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरचे विभागीय अध्यक्षांमार्फत केली जाणार आहे. नागपूर विभागीय अध्यक्ष यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. विभागीय अध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करावी आणि त्या समितीमार्फत चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करावा असेही आदेश देण्यात आलेले आहेत.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, nagpur, MLA sudhakar adbale)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here