– इतर तालुक्यातील बांधकाम कामगारांनी उपस्थित न राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील केवळ चामोर्शी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचा संच वितरण कार्यक्रम आज ०३ एप्रिल २०२५ पासून बालाजी सभागृह, चामोर्शी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे सुरू करण्यात आला आहे.
चामोर्शी तालुक्यात आयोजित या वितरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट दररोज 700 गृहपयोगी संच वितरण करण्याचे ठेवले आहे. यासाठी संबंधित कामगारांना दुरध्वनीद्वारे बोलवून त्यांची यादी वितरित स्थळी उपलब्ध केली जाईल. यादीत नोंद नसलेल्या कामगारांना त्या दिवशी प्रवेश नाकारला जाईल. त्यामुळे कामगारांनी यादीतील नावाची तपासणी करूनच वितरण स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील लवकरच गृहपयोगी वस्तूंचे वितरण सुरू होणार असून तालुक्यांतील वितरण स्थळ आणि तारीख निश्चित झाल्यानंतर संबंधित कामगारांना दुरध्वनीद्वारे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली जाईल. दरम्यान चामोर्शी येथील वितरण स्थळी इतर तालुक्यातील कामगारांनी उपस्थित राहू नये असे सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी केले गेले असून, विनाकारण गर्दी टाळण्यासाठी आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच, वितरण बंद होणार आहे किंवा नंतर मिळणार नाही, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनधिकृत दलालांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांचे कार्यालय, गडचिरोली मार्फत करण्यात येत आहे.
