देसाईगंज : ७ फुटी अजगराला सर्पमित्र तुषार यांचे जीवनदान

44

– आतापर्यंत वाचवले १०० हून अधिक सापांचे प्राण
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. २६ : तालुक्यातील चोप येथील सर्पमित्र तुषार उईके यांनी आपल्या धाडसी व पर्यावरणपूरक कार्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. जीवन बावणे यांच्या शेतात आढळलेल्या तब्बल ७ फूट लांबीच्या अजगर सापाला त्यांनी कुशलतेने पकडून सुरक्षितरित्या जंगलात सोडत जीवनदान दिले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे गावकऱ्यांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.
आज सकाळी शेतात काम करणाऱ्या मजुरांना अचानक मोठा अजगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ सर्पमित्र तुषार उईके यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र दीपक पंडेल यांच्यासह घटनास्थळी दाखल होत तुषार यांनी अतिशय दक्षतेने आणि कौशल्याने अजगराला पकडले. निरीक्षणानंतर समजले की हा अजगर निरोगी असून, त्याला लगेचच सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तुषार हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक सापांना जीवनदान दिले आहे. या यादीत कोब्रा, धामण, घोणस यांसारख्या विषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे.
सर्पमित्र तुषार यांचे हे कार्य केवळ सापांना नवजीवन देणारे नसून, मानवी जीवनही सुरक्षित करणारे आहे. त्यांच्या अथक सेवेमुळे वन्यजीव संरक्षणास चालना मिळत असून, समाजात सर्पांविषयी जागरूकताही वाढीस लागली आहे.
तुषार यांना या कार्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here